बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरालगतचा बळ्ळारी नाला सध्या जलपर्णीने व्यापला जाण्याबरोबरच झाडाझुडपांनी वेढला गेला आहे. त्यामुळे जलपर्णी हटवून या नाल्याची युद्धपातळीवर साफसफाई करावी, अन्यथा मुसळधार पावसात नाल्याच्या पुरामुळे आसपासच्या शेत पिकांचे पुन्हा प्रचंड नुकसान होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.
मागील 10-15 वर्षापासून लेंडी नाला आणि बळ्ळारी नाल्याच्या पुरामुळे आसपासच्या शेत पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. या नाल्यांची साफसफाई आणि रुंदीकरण झाले नसल्यामुळे हे नुकसान होत आहे. विशेष करून येळ्ळूर रोडपासून मुचंडीपर्यंतच्या बळ्ळारी नाल्यामुळे दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान होऊन त्यांना त्रास होत आहे.
दरवर्षी पावसाळ्यात शेत पिकांचे नुकसान करणाऱ्या बळ्ळारी नाल्यासह लेंडी नाल्यांची गाळ काढून व्यवस्थित साफसफाई करावी अशी मागणी गेल्या सुमारे 10 वर्षापासून नाल्याच्या पुराचा फटका बसणाऱ्या शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
मात्र प्रशासनाकडून त्याकडे साफ दुर्लक्ष केले जात असल्यामुळे नाल्यात मोठ्या प्रमाणात गाळ व केरकचरा साचत असतो. याव्यतिरिक्त या नाल्यांमध्ये ठिकठिकाणी अतिक्रमणही झाले आहे. सध्याच्या घडीला बळ्ळारी नाला पूर्णपणे जलपर्णी आणि झाडाझुडपांनी व्यापला गेला आहे.
या नाल्याच्या परिसरात सर्वसाधारणपणे ८ ते १० ठिकाणी ब्रिज बांधण्यात आले आहेत. ब्रिजच्या शेजारी वाढलेले गवत तोडून त्याचठिकाणी टाकण्यात येते. यामुळे हे गवत पुन्हा उगवते. यामुळे नाल्याचे पाणी पुढे वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत आहे.
नाल्यातील पाणी योग्यपद्धतीने वाहून जाण्यासाठी हे अडथळे दूर करणे गरजेचे आहे. वडगाव, जुने बेळगाव, शहापूर या भागातून वाहणाऱ्या नाल्याचे काम काही महिन्यांपूर्वी झाले आहे. मात्र हे काम अपूर्ण झाले असून यामुळे अनेक समस्या उद्भवत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
हि केवळ शेतकऱ्यांची समस्या नसून नागरी समस्या आहे. या पाण्यामुळे अनेक प्रकारची रोगराई उद्भवण्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन हा प्रश्न सोडवावा अशी मागणी करण्यात येत आहे.
या सर्व प्रकारामुळे नाल्यातील पाण्याचा निचरा होण्यास वाट नाही. त्यामुळे आता जोरदार पाऊस झाल्यास येळूर शेत शिवारातून येणाऱ्या पाण्याला पुढे जाण्यास वाट नसल्यामुळे ते अडले जाणार आहे. परिणामी यंदा देखील येळ्ळूर, वडगाव, धामणे, जुने बेळगाव, हलगा वगैरे ठिकाणच्या शेतीमध्ये पूर परिस्थिती उद्भवू शकते. तेंव्हा संभाव्य पूर परिस्थितीच्या धोक्याची लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन युद्धपातळीवर बळ्ळारी नाल्यातील जलपर्णी व झाडेझुडपे हटवून त्याची साफसफाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.