बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर स्मार्ट सिटी केवळ म्हणण्यापुरताच आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये हे पुन्हा एकदा अनगोळ मधील या प्रकारामुळे सिद्ध होत आहे. महापालिका प्रशासनाला अनेकदा विनवण्या करून देखील चक्क स्मशान भूमीच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे.
अनगोळ स्मशानभूमी मध्ये गेल्या 4 ते 5 दिवसापासून अंधार असून लाईट व्यवस्था पूर्णपणे बंद झाली आहे इतकेच काय तर पाणीही नसल्याने अंत्यविधी करताना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.
स्थानिक लोकांनी वॉटर बोर्ड आणि लाईट मेंटेनन्स यांना फोन करून देखील प्रतिसाद दिला जात नसल्याचा आरोप केला जात आहे या शिवाय अंधारामुळे मोबाईलच्या प्रकाशाच्या मध्ये अंत्यविधी करावा लागत आहे. याकडे महानगरपालिका प्रशासनाने लक्ष द्यावे वॉटर बोर्ड आणि स्ट्रीट लाईट यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
या स्मशानभूमीच्या समस्या सोडवाव्यात यासाठी महापालिका आयुक्तांना निवेदन देण्याचे ठरवण्यात आले यावेळी माजी नगरसेवक विनायक गो. गुंजटकर, भाऊ कावळे, रमेश शिंदे,दीपक अस्सलकर, पंपू मन्नोळकर आदी उपस्थित होते.
कोणत्याही शहरातील नागरिकांना सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध केल्या जातील त्यावेळीचं ते शहर स्मार्ट होते मात्र बेळगावातील जनतेला मूलभूत सुविधा मिळवून देण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याने शहराला स्मार्ट म्हणावे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.