Saturday, November 16, 2024

/

सरकारी कर्मचाऱ्यांची योग्यपद्धतीने नियुक्ती नसल्याने हिंडलगा ग्रामपंचायतीत समस्या

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव पश्चिम तालुक्याच्या व्याप्तीत येणाऱ्या हिंडलगा ग्रामपंचायतीवर पूर्णवेळ पीडीओ नसल्याने तसेच गेल्या वर्षभरापासून सेक्रेटरी नियुक्त करण्यात न आल्याने या पंचायतीच्या व्याप्तीतील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

यापार्श्वभूमीवर पंचायतीवर पूर्णवेळ पीडीओंची नियुक्ती करण्यात यावी, तसेच लवकरात लवकर सेक्रेटरी पदावर भरती करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांना देण्यात आले.

ग्रामपंचायतीच्या विविध सदस्यांच्या उपस्थितीत सदर निवेदन सादर करण्यात आले. यावेळी प्रसारमाध्यमांना माहिती देताना पंचायत सदस्य विठ्ठल देसाई बोलताना म्हणाले, शहरालगत असलेल्या या पंचायत व्याप्तीतील नागरिकांना ग्रामपंचायतीतील अपुऱ्या सुविधांमुळे गैरसोय होत आहे. पंचायतीकडून भरमसाठ कर आकारण्यात येऊनही पंचायतीचा विकास करण्यात आलेला नाही.

पाण्याच्या योजना कार्यान्वित करण्यात आलेल्या नाहीत. पूर्णवेळ पीडीओ नाही शिवाय १ वर्षभरापासून सेक्रेटरीपदी कुणाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. याशिवाय अकाउंटंट म्हणून या पंचायतीत कुणाचीही नियुक्ती करण्यात आली नाही. परिणामी संगणक उतारे, नव्या योजना आणि जनतेची इतर कामे करण्यासाठी पंचायतीत कर्मचारी नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. कचरा उचल योग्यरितीने होत नसून या समस्यांकडे तातडीने लक्ष पुरविण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्याचे ते म्हणाले.Hindlga

ग्रामपंचायत सदस्य डी. बी. पाटील बोलताना म्हणाले, हिंडलगा ग्रामपंचायतीत सध्या पीडीओ म्हणून कार्यरत असणारे इतर ३ गावातही सेवा बजावतात. यामुळे हिंडलगा ग्रामपंचायतीवर पूर्ण वेळ लक्ष देणे त्यांना शक्य नाही. याचप्रमाणे सेक्रेटरी, अकाउंटंट नसल्याने नागरिकांच्या कागदपत्रांच्या अडचणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत.

गेल्या ८ महिन्यांपासून शेकडो नागरिकांची अनेक अर्ज प्रलंबित आहेत. ग्रामपंचायतीत अनेक पदे रिक्त आहेत. अशातच सरकारने मालमत्ता करात वाढ केली असून भरमसाट वाढ करूनही सुविधा पुरविण्यात येत नाहीत. कचऱ्याची विल्हेवाट योग्यपद्धतीने लावली जात नाही. यामुळे हिंडलगा ग्रामपंचायतीवर पूर्णवेळ पीडीओंची नियुक्ती करावी तसेच रिक्त पदे भरावीत, मालमत्ता करात झालेली वाढ कमी करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन सादर करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत निवेदन सादर करण्यात आले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.