बेळगाव लाईव्ह:शहापूर नाथ पै सर्कल ते मेदार गल्लीपर्यंतच्या बोळामधील अत्यंत जुनी झालेली ड्रेनेज पाईपलाईन युद्धपातळीवर बदलून नवी पाईपलाईन घातली जावी तसेच येथील गटारींची स्वच्छता केली जावी, अशी जोरदार मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.
शहापूर नाथ पै सर्कल ते मेदार गल्लीपर्यंतच्या बोळामधील अत्यंत जुनी ड्रेनेज पाईपलाईन संपूर्णपणे खराब झाली आहे. देखभाली अभावी सदर ड्रेनेज पाईप लाईनमध्ये गाळ, माती व केरकचरा मोठ्या प्रमाणात साचल्यामुळे सांडपाण्याचा निचरा होणे बंद झाले आहे.
जुनी पाईपलाईन अनेक ठिकाणी फुटल्यामुळे ड्रेनेज मधील तुंबलेले सांडपाणी ठिकठिकाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे अस्वच्छता निर्माण होण्याबरोबरच दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे. याखेरीज सांडपाणी जमिनीत झिरपून आसपासच्या विहिरी दूषित झाल्या आहेत.
विहिरींचे पाणी दुर्गंधीयुक्त गढूळ झाले असून या पाण्याच्या वापरामुळे लोक आजारी पडत आहेत. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे मेदार गल्ली येथील गटारी तर माती व केरकचऱ्याने बुजून इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहेत. सांडपाण्याचा निचरा होण्याऐवजी या गटारीमध्ये उंदीर -घुशींचा वावर वाढला आहे. गटारी व ड्रेनेज मधून सांडपाण्याचा निचरा न होता ते तुंबून अस्वच्छ वातावरण निर्माण झाल्यामुळे मेदार गल्ली परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
गटारी व ड्रेनेजच्या स्वच्छतेसंदर्भात वेळोवेळी तक्रार करून देखील स्थानिक लोकप्रतिनिधींसह महापालिकेचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे गल्लीतील रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच मेदार गल्ली येथे युद्धपातळीवर नवीन ड्रेनेज पाईपलाईन घालण्याची आणि गटाऱ्यांची स्वच्छता करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
आपल्या समस्येसंदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना मेदार गल्ली येथील नागरिकांनी सांगितले की, नाथ पै सर्कल ते मेदार गल्लीपर्यंतच्या बोळामधील 50 -60 वर्षे जुनी ड्रेनेज पाईपलाईन पूर्णपणे खराब झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सांडपाणी तुंबत आहे. ही जुनी पाईपलाईन बोट लावले तरी फुटेल इतकी ठिसूळ झाली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी फुटलेल्या व मोठ्या प्रमाणात तुंबलेल्या या ड्रेनेज पाईपलाईन मधील दुर्गंधीयुक्त सांडपाणी आसपास रस्त्यावर पसरण्याबरोबरच जमिनीत झिरपून परिसरातील विहिरींचे पाणी दूषित झाले आहे.
विहिरीच्या त्या पाण्याने साधी आंघोळ केली तरी अंगाला दुर्गंधी येत आहे. विहिरीतील दूषित पाण्याचा वापर, तसेच सर्वत्र साचलेले ड्रेनेजचे सांडपाणी आणि दुर्गंधीमुळे येथील नागरिकांचे विशेष करून लहान मुले व वयोवृद्धांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक जण आजारी पडत आहेत. त्यामुळे या ठिकाणची ड्रेनेज पाईपलाईन युद्ध पातळीवर बदलणे अत्यावश्यक आहे. येथील गटारींची देखील वेळच्यावेळी साफसफाई केली जात नाही. गटारी केरकचरा, गाळ व मातीने बुजल्यामुळे सांडपाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत वेळोवेळी तक्रार करून देखील नगरसेवक व महापालिकेचे अधिकारी त्याची दखल घेत नाहीत, अशी तक्रार करून मेदार गल्ली येथील साफसफाईकडे गेल्या अनेक वर्षापासून महापालिकेचे साफ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. याप्रसंगी मंगेश चव्हाण, मुकुंद धामणेकर, दिपक कलाल, ईश्वर जोरापुरे, सुनीता जोरापुरे, रेखा लोहार, तेज होणगेकर, सुभाष होणगेकर आदी रहिवासी उपस्थित होते.