बेळगाव लाईव्ह : दरवर्षी प्रमाणे 24 जून सार्वत्रिक बंधुता दिनानिमित्त आज सोमवारी सकाळी लॉज व्हिक्टोरिया क्रमांक 9 यांच्यातर्फे विद्या आधार संस्थेला पुस्तकं, वृत्तपत्र यांची रद्दी दान करण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
शहरातील कॅम्प येथील मेसोनिक हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्या आधारने गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याची त्यांची वचनबद्धता दाखवताना गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी 10,000 रुपयांचा धनादेश दिला.
कार्यक्रमास चेअरमन विनायक बोंगाळे, विद्या आधारचे सचिव असलेले सामाजिक कार्यकर्ते ॲलन विजय मोरे, गंगाधर पाटील, कोमल शिरसाट, विश्वास पाटील यांच्यासह लॉज व्हिक्टोरियाचा मोठा आधार लाभलेल्या अनेक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. विद्या आधार संस्थेतर्फे टाकाऊ पुस्तक वृत्तपत्रांची रद्दी यांच्यातून निधी उभारून त्याचा विनियोग गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी केला जातो.
ही संस्था जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिक्षणाद्वारे उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे. आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल विनायक लोकूर यांनी आभार मानले.
मेसोनिक हॉलमधील आजच्या कार्यक्रमाने सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी बंधुता आणि समुदायाच्या समर्थनाचे महत्त्व अधोरेखित केले.