बेळगाव लाईव्ह: बाहेरील उमेदवार असा ठपका असूनही तब्बल पावणेदोन लाख मताधिक्क्याने विजयी झालेले बेळगाव लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार जगदीश शेट्टर यांनी आज बेळगावमध्ये दाखल होऊन पत्रकार परिषद घेतली.
पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच त्यांनी समस्त बेळगावकरांचे आभार मानले. ‘जगदीश शेट्टर काय आहेत, त्यांची शक्ती किती आहे हे बेळगावकरांनी संपूर्ण राज्याला दाखवून दिले, माझ्या विजयासाठी सर्वांनी अथक परिश्रम घेतले.
बेळगावकरांचे प्रेम आपण कधीच विसरणार नाही आणि बेळगावकरांचा विश्वास सार्थ करेन, हुबळीतील शेट्टर आणि बेळगावमधील शेट्टर यांच्यात फरक आहे’ अशी प्रतिक्रिया जगदीश शेट्टर यांनी सर्वप्रथम व्यक्त केली.
यानंतर त्यांनी बेळगावच्या विकासासंदर्भात पत्रकार परिषदेत काही मुद्दे मांडले. यामध्ये विमानतळाचा विकास, दिवंगत रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांच्या कार्यकाळात अपूर्ण असलेल्या रेल्वे लाईनच्या तांत्रिक त्रुटी दूर करून नव्याने कामकाजाची सुरुवात, विमानतळावर नव्याने उभारण्यात येणाऱ्या टर्मिनलचा आढावा यासह बेळगाव शहर आणि ग्रामीण भागाच्या विकासावर भर देण्यात येणार असल्याचे शेट्टर म्हणाले.
आज बेळगाव विमानतळावर जाऊन तेथील विकासकामे आणि इतर गोष्टींबाबत बैठक घेणार आहेत. बेळगाव विमानतळावर टर्मिनल – २ उभारण्यात येत असून याच्या कामकाजाचा आढावा तसेच बेळगावमध्ये इतर कोणत्या ठिकाणी नवे विमानतळ सुरु करता येईल, याबाबतचा आढावा ते घेणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत प्रतक्षरते आणि अप्रत्यक्षरीत्या अनेकांची मदत झाली आहे मात्र प्रत्यक्षरीत्या कुणी मदत केली ते लवकरच सांगू असं ते म्हणाले.
यानंतर उद्या जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीत स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या कामकाजाचा आढावा, कामकाजाची पाहणी, बेळगाव, कित्तूर, धारवाड रेल्वे लाईनचे अर्धवट स्थितीत असलेले कामकाज, केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या अम्मलबजावणीसंदर्भात चर्चा, शहर तसेच ग्रामीण भागातील विकासकामे यासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत विविध मुद्द्यांवर चर्चा आणि आढावा घेतला जाणार आहे.