बेळगाव लाईव्ह :रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम बेळगाव आणि स्पेक्ट्रम टॅलेंट मॅनेजमेंट लिमिटेड बेंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारी 22 जून 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत क्लब रोडवरील बी. के. कॉलेज येथे ‘रोटरी मेगा जॉब फेअर -2024’ चे आयोजन करण्यात आले असून नोकरीसाठी इच्छुक असलेल्यांनी या जॉब फेअरचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शहरामध्ये रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम बेळगाव यांच्यातर्फे आज बुधवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये उपरोक्त आवाहन करण्यात आले. यावेळी बोलताना रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम बेळगावचे पदाधिकारी डी. बी. पाटील म्हणाले की, बेळगाव शहर आणि परिसरातील ग्रामीण भागातील होतकरू युवकांना चांगला रोजगार उपलब्ध करून देण्याच्या हेतूने रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम बेळगावने हा उपक्रम सुरू केला आहे. सर्वांनाच सरकारी नोकऱ्या मिळू शकत नाहीत.
त्यामुळे खाजगी कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळवून देण्यासाठी आम्ही मेगा जॉब फेअरचा हा उपक्रम राबवत आहोत. सदर उपक्रमांतर्गत इयत्ता दहावी उत्तीर्ण पासून पदवी, पदव्युत्तर पदवी संपादन करूनही बेरोजगार असणाऱ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहेत. तेंव्हा या उपक्रमाचा इच्छुक युवकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा. या जॉब फेअरमध्ये मुंबई, बेंगलोर, विजापूर वगैरे वेगवेगळ्या मोठ्या शहरातील मोठमोठ्या कंपन्यांसह बेळगावमधील नामांकित कंपन्यांचा सहभाग असणार आहे. मागील वर्षी आम्ही आयोजित केलेल्या जॉब फेअरच्या माध्यमातून बेळगाव शहर परिसरातील सुमारे 600 युवकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत असे सांगून मध्यंतरी एपल कंपनीसाठी घेतलेल्या नोकर भरती मुलाखतींच्या माध्यमातून 8 -10 युवतींना नोकऱ्या मिळाल्या आहेत, अशी माहिती पाटील यांनी दिली.
दरम्यान, रोटरी मेगा जॉब फेअर 2024 रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगावी, स्पेक्ट्रम टॅलेंट मॅनेजमेंट लिमिटेड, बंगलोर यांच्या ‘रोटरी मेगा जॉब फेअर -2024’ मध्ये 50 हून अधिक कंपन्या आणि बेळगाव जिल्ह्यातील विविध खाजगी आणि सरकारी महाविद्यालयांच्या विविध प्रवाहांमधून 4,000 पेक्षा जास्त नवीन आणि अनुभवी उमेदवारांचा सहभाग अपेक्षित आहे.
संपूर्ण दक्षिण आणि पश्चिम ठिकाणांवरील कंपन्यांच्या विस्तृत श्रेणीतून यावेळी भरती प्रक्रिया होणार आहे. यामध्ये कॉर्पोरेट्स, एफएमसीजी कंपन्या, ई-कॉमर्स दिग्गज, स्टार्ट अप्स, फार्मा, हॉस्पिटॅलिटी, टेक्सटाईल/पोशाख, रिटेल, बँक आणि वित्तीय संस्था, उत्पादन, ऑटोमोबाईल कंपन्या, बीपीओ, ट्रॅव्हल आणि टुरिझम फर्म, हॉस्पिटॅलिटी, हेल्थ केअर वगैरे विभिन्न कंपन्यांचा मोठ्या संख्येने समावेश असणार आहे. रोटरी मेगा जॉब फेअर शनिवार दि. 22 जून 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 3, बी. के. कॉलेज (ज्योती कॉलेज), क्लब रोड, बेळगाव येथे होईल.
सदर जॉब फेअर सर्व नोंदणीसाठी प्लेसमेंट शुल्काविना खुला आहे. उमेदवार/विद्यार्थी नोंदणी फॉर्म: https://forms.gle/NcNLsSapPgvt2h3KA नियोक्ता नोंदणी फॉर्म: https://forms.gle/9aBD4646dQNZ52D29. अधिक माहितीसाठी कॉल करा: 8105308804/966308804/96639808853808/966380858804.