बेळगाव लाईव्ह : लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात काँग्रेसला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. परंतु प्रतिष्ठेच्या जोरावर लढविण्यात आलेल्या चिक्कोडी मतदार संघात यश मिळूनही एकमेकांविरोधात टीकाटिप्पण्या सुरु आहेत.
याच पार्श्वभूमीवर आज मंत्री सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव काँग्रेस भवन मध्ये आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत काही विधाने केली. कुडची विधानसभा मतदार संघाचे आमदार महेंद्र तम्मण्णावर यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याचे विधान जारकीहोळींनी केले होते. मात्र आज झालेल्या बैठकीत बोलताना ते म्हणाले, आपण काँग्रेस नेत्यांनी घेतलेल्या पक्षविरोधी कारवायांच्या पार्श्वभूमीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. परंतु आपण कुणालाही लक्ष्य करून कोणते विधान केले नाही. ज्यांनी चुका केल्या, त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून दिली.
घडलेल्या प्रकाराबाबत चुका निदर्शनात आणून देण्याचा प्रयत्न केला. अथणीचे आमदार सवदी किंवा कुडचीचे आमदार तम्मण्णावर यापैकी कुणाच्याही विरोधात आपण तक्रार केली नाही. राजकारणात अशा गोष्टी घडणे सहज आहेत.
परंतु चिक्कोडी मतदार संघात मिळालेले यश हे अपेक्षेपेक्षा कमीच आहे, आपल्याच लोकांनी पक्षविरोधी भूमिका घेतली याचा फटका या मतदार संघात काँग्रेसला बसला अन्यथा यापेक्षाही अधिक मताधिक्क्याने काँग्रेसला विजय साधता आला असता, असे सतीश जारकीहोळी यांनी नमूद केले.
कर्नाटकातील काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या कमी जागांमुळे काँग्रेस सरकार येथील हमीयोजना बंद करणार का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी विचारला. यावर सतीश जारकीहोळी म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे किंवा कोणत्याही कारणामुळे हमीयोजना रद्द होणार नाहीत. हमीयोजना बंद करण्याचा प्रश्नच उदभवत नाही.
हमीयोजनांचा परिणाम काँग्रेसला चांगला झाला असून यामुळेच काँग्रेस उमेदवारांना मोठी आघाडी मिळाली. देशपातळीवरील राजकारणाविषयी बोलताना ते म्हणाले, मागील वेळी भाजपाला मिळालेल्या जागांपेक्षा या निवडणुकीत खूपच कमी जागा मिळाल्या आहेत. परंतु तरीही एनडीएकडे संख्याबळ अधिक असल्याकारणाने एनडीएचेच सरकार स्थापन होईल.
सत्ताधाऱ्यांनी धर्मावर आधारित राजकारण सोडून यापुढे विकासावर भर द्यावा. धर्मावर आधारित राजकारण करूनही अयोध्येत भाजपाला अपयश आले, त्यामुळे यापुढे तरी विकासावर भर देतील, अशी आशा आहे, अशी टिप्पणीही जारकीहोळींनी केली.