बेळगाव लाईव्ह विशेष : सत्ता आणि घराणेशाही हे समीकरण भारतीयांसाठी नवे नाही. देशात गेल्या ७५ वर्षांपासून लोकशाही असूनही मोजक्या कुटुंबाकडे सत्ता आहे अशी नेहमीच ओरड होते.
मात्र काही कुटुंब अशी आहेत जी राजकीयदृष्ट्या प्रभावशाली आहेत हे सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रातील राजकारणाप्रमाणेच कर्नाटकातही घराणेशाहीचा जोर वाढू लागला असून हुक्केरी, कत्ती, जोल्ले, जारकीहोळी यांच्यासह अनेक कुटुंबांची नावे आहेत. परंतु कर्नाटकात अधिकाधिक एकाच कुटुंबाकडे सत्ता असणाऱ्या कुटुंबामध्ये जारकीहोळी कुटुंबाचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे.
चार आमदारपदे, मंत्रिपद आणि आता खासदारकी! कर्नाटकाच्या राजकारणाची चक्रे फिरवणाऱ्या या कुटुंबात आता तरुण राजकारणी महिलेचीही एंट्री झाली आहे. कर्नाटकातील सत्ताकेंद्र म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या कुटुंबात कर्नाटकाच्या राजकारणात भूकंप आणणारे माजी मंत्री रमेश जारकीहोळी, विद्यमान मंत्री सतीश जारकीहोळी, विधान परिषद सदस्य लखन जारकीहोळी आणि आमदार भालचंद्र जारकीहोळी यांचा समावेश होता. मात्र आता खासदारकीची निवडणूक लढवून लाखांच्या मताधिक्क्याने विजयी होत याच कुटुंबातील तरुणी खासदारपदी विराजमान झाली आहे.
वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी खासदारपदी वर्णी लागलेल्या नूतन खासदार प्रियांका जारकीहोळी या देशातील कमी वयाच्या महिला खासदारांमधील दुसऱ्या क्रमांकाच्या महिला खासदार म्हणून गणल्या जाणार आहेत.
चिक्कोडी लोकसभा मतदार संघातून राजकारणाचा मजबूत अनुभव असणाऱ्या जोल्ले कुटुंबियांना देखील जारकीहोळी कुटुंबाने मागे टाकले असून दोनवेळा खासदारपद भूषविणाऱ्या आण्णासाहेब जोल्ले यांचा प्रियांका जारकीहोळी यांनी पराभव केला आहे. चिक्कोडी लोकसभा मतदार संघात जोल्ले कुटुंबीयांची पकड अधिक मजबूत आहे. आमदारपद, मंत्रिपद आणि खासदारपद असूनही या मतदार संघात राजकारणात नव्या असलेल्या काँग्रेसच्या महिला उमेदवाराला जनतेने दिलेली अधिक पसंती सर्वांच्याच भुवया उंचावत आहे. बेळगावच्या राजकारणातील किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे त्यांचे वडील सतीश जारकीहोळी यांच्यासह कुटुंबातील दिग्गजांचा पाठिंबा घेत राजकारणातील अनुभव आणि राजकीय नेतृत्वशैली या मार्गदर्शनातून प्रियांका जारकीहोळी यांचा विजय साध्य झाला आहे.
कर्नाटकातील जारकीहोळी बंधूंची सत्ता कमी करण्यासाठी अनेकांनी अंतर्गत राजकारण केल्याचे आरोप पुढे येत आहेत. यामुळेच काँग्रेसला कर्नाटकात अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाल्याचे दिसून आले आहे. मात्र राजकारणात घट्टपणे पाय रोवून उभ्या असणाऱ्या जारकीहोळी कुटुंबाने जिल्हापातळी, राज्यपातळीसह आता देशपातळीवरील राजकारणातही पाय रोवला असून या कुटुंबाच्या राजकीय नेतृत्वशैलीकडे सर्वांचीच नजर खिळली आहे.