बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्र आणि शेजारील महाराष्ट्र व गोवा राज्यात खून, खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी अपहरण, दरोडा, सुपारी, शस्त्र कायदा भंग आदी गुन्हे करून पोलिसांची डोकेदुखी झालेला अत्यंत कुख्यात गुंड आणि राऊडी शिटर विशाल सिंह चौहान याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरुद्ध गुंडा ॲक्ट खाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गुंड विशाल सिंह चौहान (वय 25, मूळ रा. चिक्कनंदीहळ्ळी ता कित्तूर, सध्या रा. कदम बिल्डिंग शास्त्रीनगर बेळगाव) याच्या विरुद्ध एक खून, 5 खुनाचे प्रयत्न, एक शस्त्र कायदा भंग प्रकरण, एक पैशासाठी अपहरणाचे प्रकरण, 2 वेळा तडीपार आदेशाचे उल्लंघन, महाराष्ट्रात खुनाचा प्रयत्न आणि शस्त्र कायदा भंगाची 2 प्रकरणे, गोवा राज्यात चोरीचे एक प्रकरण या पद्धतीने एकूण 14 प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.
याप्रकारे गुन्हे दाखल असतानाही तडीपार आदेशाचे उल्लंघन करून विशाल सिंग यांनी पुन्हा बेळगाव शहरात प्रवेश करून टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या व्याप्तीमध्ये पैशासाठी एकाचे अपहरण केले. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास कार्य हाती घेतले होते.
कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र राज्यामध्ये गुन्हेगारी कारवाया करून विशाल सिंह हा पोलिसांची डोकेदुखी झाला होता. परिणामी त्याने केलेले एकूण 14 गुन्हे आणि तडीपार आदेशाचे उल्लंघन याची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी विशाल सिंह याला गजाआड करण्यासाठी त्याच्या विरुद्ध न्यायालयाकडून 03 अटक वॉरंट देखील मिळवला होते. बेळगाव शहरांमध्ये त्याचप्रमाणे शेजारील राज्यांमध्ये गुन्हे करून विशाल सिंग तिन्ही राज्यातील पोलिसांना हुलकावणी देत होता. पोलिसांच्या तावडीत सापडण्याच्या भीतीने, त्यांना आपला थांगपत्ता लागू नये यासाठी तो आपले सर्व व्यवहार व्हाट्सअप, इन्स्टाग्राम यासारख्या ॲप्सच्या माध्यमातून करत होता
. त्याला पकडण्यासाठी बेळगाव शहराचे कायदा व सुव्यवस्था पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक स्थापण्यात आले होते. या पथकाचे सदस्य असलेले उद्यमबाग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण होनकट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशाल सिंग याचा माग काढून त्याला अटक केली.
याप्रकरणी बेळगाव शहर पोलीस आयुक्तांच्या सूचनेवरून खडे बाजार पोलीस ठाण्यात गुंडा कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंडा कायद्याखाली अटक करण्यात आलेल्या विशाल सिंह चौहान याला न्यायालयासमोर हजर केले असता येत्या 30 एप्रिल 2024 पर्यंत त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
दरम्यान, बेळगाव शहरातील अत्यंत कुख्यात गुंड आणि राउडी शीटर विशाल सिंह चौहान नावाचा याला अटक करण्यात आली असून तो आता गुलबर्गा तुरुंगात आहे. आमचे पोलीस आयुक्त इडा मार्टिन सर यांनी त्यांच्या विरोधात गुंडा कायदा मंजूर केला आहे. तसेच माननीय उच्च न्यायालयाच्या 3 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर त्याची पुष्टी करण्यात आली आहे. तो यापुढे तुरुंगात असणार असून त्याच्यावर कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र या 3 राज्यात 14 गंभीर गुन्हे दाखल आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी अपहरण, दरोडा, सुपारी, आर्म्स ॲक्ट आदी गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग आहे.
बेळगाव शहर पोलिसांच्या हद्दीत असा गुंडा कायद्याचा (कृत्याचा) खटला कर्नाटकच्या उच्च न्यायालयाने मंजूर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यासाठी कठोर परिश्रम घेणाऱ्या आमच्या आमच्या संपूर्ण पथकाचे आम्ही अभिनंदन करतो, असे पोलीस आयुक्तालयाकडून कळविण्यात आले आहे.