बेळगाव लाईव्ह : विशिष्ट ऋतूत येणाऱ्या फळांना ग्राहकांकडून चांगलीच मागणी असते. दैनंदिन आहारात फळांचे सेवन करणे महत्त्वाचे मानले जाते.
यंदाच्या आंबा हंगामात मोठ्या प्रमाणात विविध प्रजातींच्या आंब्यांच्या आवकेनंतर आता बाजारपेठेत अननसाची आवक वाढली आहे. शहर परिसरात ठिकठिकाणी फळविक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणात अननस विक्री सुरू असून आवक वाढल्याने दर देखील कमी झाले आहेत.
कर्नाटकात शिमोगा जिल्ह्यामध्ये अननसाची लागवड केली जाते. यामुळे बेळगाव शहराच्या बाजारपेठेत शिमोगा आणि बागलकोट येथून अननसाची आवक होत असते.
सध्या अननसाचा हंगाम असल्यामुळे ही आवक सुरू झाली असून एक नग आकारमानानुसार 20 ते 80 रुपयांना विक्री केला जात आहे. शहरातील बाजारात सध्या केव, क्वीन आणि मॉरिशस या तीन प्रकारचे अननस विक्रीसाठी उपलब्ध असून त्यांच्या विक्रीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पावसाळ्यात येणारी आळंबी देखील विक्रीसाठी बेळगाव बाजारपेठेत दाखल झाली आहे.