बेळगाव लाईव्ह: दरवर्षीप्रमाणे सिद्धेश्वरनगर येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथील वैष्णव सदन आश्रमातर्फे येत्या गुरुवार दि. 5 जुलै 2024 रोजी सकाळी 7 वाजता येळ्ळूर -धामणे ते श्री क्षेत्र पंढरपूर अशा पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
ओम गुरुदेव जंगलीदास महाराज यांच्या आश्रमातील अश्व (घोडा) दिंडी सोहळ्यासाठी सेवेत सहभागी होणार असून गतवर्षीप्रमाणे प.पू. ह.भ.प. श्री तात्यासाहेब वास्कर महाराज, प.पू. ह.भ.प. श्री पुरुषोत्तम महाराज गिंडे व प.पू. गुरुवर्य तुकाराम महाराज मुरगोड यांच्या आशीर्वादाने या पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.
येळ्ळूर -धामणे येथून 5 जुलै रोजी सुरू होणाऱ्या सदर पायी दिंडीची गुरुवार दि 18 जुलै 2024 रोजी दुपारी 12 वाजता श्रीक्षेत्र पंढरपूर येथे महाप्रसादाने सांगता होणार आहे.
तरी पंचक्रोशीतील येळ्ळूर, नागुर्डा, हालगा, मुतगा, धामणे, ब्रह्मगट्टी, मासगौडहट्टी देवगनहट्टी, अवचारहट्टी, सुळगे (ये.), देसूर, राजहंसगड नंदीहळ्ळी, नागेनहट्टी, कोंडसकोप्प, इदलहोंड, तोपिनकट्टी, रामगुरवाडी,
मंडोळी, होनकल, माचीगड, जुने बेळगाव, वडगाव, शहापूर व बेळगाव येथील समस्त वारकरी भाविकांनी तन-मन-धन अर्पण करून दिंडी सोहळ्यात सहभागी व्हावे आणि श्री ज्ञानेश्वर माऊली व श्री पांडुरंगाच्या नामस्मरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन
वैष्णव सदन आश्रम पायी दिंडी कमिटीचे अध्यक्ष बाळू शंकर केरवाडकर, सेक्रेटरी अजित भरमांना पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.