बेळगाव लाईव्ह:शाळेऐवजी टिळकचौक येथील एका मोठ्या कापड दुकानाच्या जिन्यावर संशयास्पदरित्या रचून ठेवलेली माध्यान्ह आहाराच्या अन्नधान्यांचा साठा अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी जप्त करून चौकशी सुरू केल्याची घटना आज शनिवारी सायंकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, टिळक चौक येथील मुख्य रस्त्यावर एका मोठ्या कापड दुकानाच्या जिन्यावर एका बाजूला शाळेतील मुलांसाठी असलेल्या माध्यान्ह आहाराच्या अन्नधान्यांची पोती रचून ठेवण्यात आली असल्याची माहिती कोणा अज्ञाताने फोनवरून आज सायंकाळी अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांना दिली.
सदर माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ती पोती ताब्यात घेण्याबरोबरच चौकशीला प्रारंभ केला आहे. शाळेमध्ये अन्नधान्याची पोती ठेवण्यासाठी सोयीची जागा नसल्यामुळे पावसात पोती सुरक्षित राहावी म्हणून एका अंगणवाडी शिक्षिकेने ती त्या कापड दुकानाच्या जिन्यावर ठेवल्याचे कळते.
एकंदर खरी वस्तुस्थिती काय हे तात्काळ समजू शकले नसले तरी चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल.
हा जर शालेय मुलांसाठी असलेले अन्नधान्य लाटण्याचा प्रकार असेल तर रीतसर पोलीस तक्रार केली जाईल, असे अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.