बेळगाव लाईव्ह : माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी बेळगावमध्ये सदाशिव नगर येथे २२ गुंठे जमीन लीजवर दिली आहे.
या जागेवर मराठा भवन उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल बेनके यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव जिल्हा आणि तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यातून प्रयत्न करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
आज माजी आमदार अनिल बेनके यांच्या कार्यालयात बेळगाव जिल्हा कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. मराठा समाजाच्या शिक्षणासाठी, विकासासाठी आणि उन्नतीसाठी विचारविनिमय करण्यासाठी सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मराठा समाज बांधवांना एका छताखाली आणून समाजाला बळकटी देण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
बेळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी व प्रमुख नेते मंडळी यांचा सल्ला घेऊन पुढील कामकाज करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच मराठा समाजाच्या हितार्थ विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी येत्या २६ जून रोजी
पुन्हा एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे.
या बैठकीस दिलीप पवार, बसवराज म्यॅगोटी, संजीव भोसले, डी. बी. पाटील, एस. व्ही. जाधव, मनोज पाटील , प्रमोद बी. गुंजीकर, रोहन कदम, सुरेश पाटील, राहुल पवार, तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
माजी आमदार अनिल बेनके यांनी पाच वर्षाच्या आमदारकीच्या काळात अनेकदा मराठा भवन उभारण्यासंदर्भात वाच्यता केली होती मात्र कोणतेही काम पुढे गेले नव्हते. आता या बैठकीनंतर मराठा भवनाचे काम मार्गी कधी लागणार हा प्रश्न समाज माध्यमातून विचारला जात आहे.