Tuesday, July 2, 2024

/

शिक्षण खात्याचा भोंगळ कारभार; सहावीच्या मराठी पुस्तकात अक्षम्य चुका

 belgaum

बेळगाव लाईव्ह :मुलांच्या उज्वल भविष्यासाठी शाळेत दिले जाणारे शिक्षण अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे इयत्तेनुसार पाठ्यपुस्तकात दिलेला अभ्यासक्रम अचूकपणे समाविष्ट करणे गरजेचे असते. तथापि यंदाच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकात अक्षम्य चुका झाल्या आहेत. शब्दांना उकार, वेलांटी आणि काना, मात्रा नसल्यामुळे संपूर्ण पाठ्यपुस्तक सदोष असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

वास्तविक इयत्तेनुसार अभ्यासक्रमाचे नियोजन केल्यानंतर पाठ्यपुस्तकांच्या छपाई पूर्वी शालेय शिक्षण मंडळ व पाठ्यपुस्तक रचना समितीने पाठ्यपुस्तकाची पडताळणी करणे आवश्यक असते. त्यातील व्याकरण व अन्य चुका शोधून त्यांची दुरुस्ती केली गेली पाहिजे. तथापि कर्नाटकातील शालेय शिक्षण मंडळ व पाठ्यपुस्तक रचना समितीच्या बेजबाबदारपणामुळे इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकांमध्ये मोठ्या प्रमाणात अक्षम्य चुका झाल्या आहेत. यापैकी कांही चुका गंभीर असून त्यामुळे अर्थाचा अनर्थ झाला आहे.

एकीकडे इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकात झालेल्या चुका शालेय शिक्षण मंडळ आणि पाठ्यपुस्तक रचना समितीचा सावळा गोंधळ अधोरेखित करत आहेत. एकंदर चुका निदर्शनास आल्यामुळे पाठ्यपुस्तकांची पुन्हा छपाई करावी लागणार असून मंडळाला दुसऱ्यांदा पाठ्यपुस्तक छपाईचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. विद्यादानाचे पवित्र कार्य करणारे शिक्षक पाठ्यपुस्तकातील चुका वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देणार? की पाठ्यपुस्तकात छापलेलेच प्रमाण मानून विद्यार्थ्यांना चुकीचे ज्ञानदान करणार हे पहावे लागणार आहे. शालेय शिक्षण व पाठ्यपुस्तक मंडळामध्ये बेळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ व नामांकित शिक्षक असूनही पाठ्यपुस्तकात चुका झाल्यामुळे सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.

 belgaum

इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील चुका संदर्भात बोलताना माजी मुख्याध्यापक मालोजीराव अष्टेकर म्हणाले की, कर्नाटक सरकारच्यावतीने राज्यातील सर्व शालेय मुलांसाठी पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी विविध भाषेतील पाठ्यपुस्तक मंडळ तयार करण्यात आली आहेत. बेळगाव आणि सीमाभागातील मराठी विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेतून पाठ्यपुस्तके तयार करण्याकरिता अशाच प्रकारे पाठ्यपुस्तक मंडळ तयार करण्यात आले आहे.

या पाठ्यपुस्तक मंडळांनी आपापली पुस्तके तयार करून सरकारकडे अर्थात शिक्षण खात्याकडे सादर केली आहेत. यातील इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकांमधील चुका पाहून आश्चर्याचा धक्का बसला. सदर पुस्तकामध्ये पाठ्यपुस्तक मंडळाने विश्वास बसणार नाही इतक्या प्रचंड चुका करून ठेवल्या आहेत. त्यामुळे या पाठ्यपुस्तक मंडळाने इतक्या मोठ्या प्रमाणात चुका केल्याच कशा? हा प्रश्न समस्त मराठी भाषिकांना सतावत आहे. सदर पाठ्यपुस्तकांमध्ये पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत एकही पान असे नाही की ज्यावर चूक नाही. काना मात्रा असो, वेलांटी असो, उकार असो किंवा एखादा जोडाक्षराचा शब्द लिहिलेला असो यामध्ये मंडळाने केलेल्या प्रचंड चुका सहनशीलतेच्या पलीकडे आहेत.

ज्यावेळी मी हे पाठ्यपुस्तक पाहिले त्यावेळी या पुस्तकाच्या निर्मितीसाठी नामांकित अशा शिक्षकांची नियुक्ती केलेली आहे. ज्यांनी अनेक वर्ष या शिक्षण क्षेत्रात सेवा केली आहे. त्यांच्या हातातून या प्रकारची चूक घडावी याचे आश्चर्य वाटल्या वाचून राहत नाही. सदर पाठ्यपुस्तक मंडळाने पाठ्यपुस्तकाची छपाई होण्यापूर्वी त्यातील मजकूर शुद्ध भाषेत आहे की नाही? याची शहानिशा करायला हवी होती.

पाठ्यपुस्तकातील मजकुराची शुद्धता तपासली जाणे अत्यंत आवश्यक आहे. तथापि इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकावर काम करणाऱ्या मंडळातील मंडळींचे त्याकडे दुर्लक्ष होणे हा चिंतेचा विषय आहे. संबंधित मंडळींनी पाठ्यपुस्तकाची छपाई झाल्यानंतर यावर नजर टाकली की नाही? अशी शंका येते. तसेच अशा प्रकारची पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांच्या हातात गेल्यानंतर त्या विद्यार्थ्यावर कोणता परिणाम होऊ शकतो याचा गांभीर्याने विचार केला गेला पाहिजे. तेंव्हा समस्त मराठी भाषिकांच्यावतीने माझी सरकारला विनंती आहे की, केवळ इयत्ता सहावीच नव्हे तर इतर पाठ्यपुस्तकेही अशाच प्रकारची आहेत का? याची पडताळणी केली जावी.

या खेरीज इयत्ता सहावीच्या पुस्तकात झालेल्या चुका दुरुस्त करण्याच्या दृष्टीने सरकारने ताबडतोब कार्यवाही करणे आवश्यक आहे. तसेच पाठ्यपुस्तक मंडळातील सदस्यांनी सदर पाठ्यपुस्तकातील प्रत्येक पानावरील चूक सरकारच्या निदर्शनास आणून देणे आणि ती दुरुस्त करणे गरजेचे आहे. इतक्या गंभीर चुका का झाल्या? याची चौकशी करून त्याला जबाबदार असलेल्या वर कारवाई झाली पाहिजे. तसेच अशा चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी सरकारने घेतली पाहिजे.

यापूर्वी देखील अनेक वेळा पाठ्यपुस्तकांमध्ये चुका झाल्या होत्या. मात्र तक्रार येताच सरकारने ताबडतोब ती पाठ्यपुस्तके बदलून नवी पाठ्यपुस्तके छापून दिली आहेत. त्यानुसार यंदा देखील मराठी, कन्नड, इंग्रजी अथवा अन्य कोणत्याही भाषेतील पाठ्यपुस्तकांमध्ये चुका असतील तर त्या चुका दुरुस्त करून चांगला शुद्ध मजकूर असलेली पुस्तकं विद्यार्थ्यांच्या हातात जाणे अत्यावश्यक आहे. या संदर्भात कर्नाटक सरकार तऱ्हेने योग्य तो क्रम घेईल असा मला विश्वास आहे असे सांगून जर चुका दुरुस्त न करता पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांच्या माथी मारण्यात आली तर त्या विरुद्ध पालक व विद्यार्थी आंदोलन छेडतील याची दखल कर्नाटक सरकारने घ्यावी, असे माजी मुख्याध्यापक मालोजीराव अष्टेकर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, दोषपूर्ण पाठ्यपुस्तकांच्या अनुषंगाने गेल्या दोन-तीन दिवसात शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराविरुद्ध सडकून टीका झाल्यानंतर या विभागाला जाग आली आहे. व्याकरणाच्या अक्षम्य चुका असलेल्या सहावीच्या मराठी पुस्तकांप्रमाणे दोषपूर्ण असलेली पुस्तके शिक्षण विभागाकडून मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके दिली जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.