बेळगाव लाईव्ह : खादरवाडी परिसरातील माळरान जागेवर असणाऱ्या बक्काप्पा देवाचा उत्सव भक्तिभावात साजरा करण्यात आला. मजगाव, पिरनवाडी, हुंचेहट्टी आणि खादरवाडी अशा चार गावातील भाविक एकत्रित येऊन दरवर्षी हा उत्सव साजरा करतात.
उत्तम पीक पाण्यासाठी मागणी करून याठिकाणी पंचांच्या वतीने गाऱ्हाणे घातले जाते. तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. सालाबादप्रमाणे यंदाही हि यात्रा मोठ्या उत्साहात आणि परंपरेनुसार पार पडली. यावेळी उपस्थित भाविकांच्या उपस्थितीत बक्काप्पा देवाला गाऱ्हाणे घालण्यात आले.
सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य लाभावे, पीक पाणी उत्तम व्हावे, यासाठी मुख्य पंचांच्या उपस्थितीत गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम पार पडला. यानंतर नारळ फोडून महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला.
येथील माळरानावर असलेल्या जागेबद्दल स्थानिकांचा भूमाफियांसोबत वाद सुरु आहे. हा भूभाग गिळंकृत करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भूमाफियांनी भाविकांतर्फे इशाराही देण्यात आला आहे.
या देवस्थानाची हि जागा काही भूमाफियांनी घशात घालण्याचा प्रयत्न केला असून समस्त नागरिकांकडून याचा निषेध होत आहे. या जागेवरील ताबा भूमाफियांनी सोडावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या देवस्थानावर अनेक भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत दरवर्षी याठिकाणी हा उत्सव केलाच जाईल, असे उपस्थित भाविकांनी यावेळी सांगितले.