बेळगाव लाईव्ह:बेळगाव मध्यवर्ती, शहर आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे बेळगावसह सीमाभागातील समस्त मराठी भाषिकांच्यावतीने 1986 च्या कन्नड सक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आज शनिवारी 1 जून रोजी हुतात्मा स्मारक, हिंडलगा येथे भावपूर्ण वातावरणात गांभीर्याने पार पडला. यावेळी कन्नड सक्ती विरुद्धचा लढा सुरूच ठेवण्याचा आणि महाराष्ट्रात सामील होण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
कर्नाटक सरकारने लागू केलेल्या कन्नड सक्ती विरोधात 1986 मध्ये झालेल्या मोठ्या आंदोलनात भरमाण्णा कदम (सुळगे), मोहन पाटील (सुळगे), भावकू चव्हाण (बेळगुंदी), कल्लाप्पा उचगावकर (बेळगुंदी), परशराम लाळगे (उचगाव), शंकर खन्नूकर (जुने बेळगाव), मारुती गावडा (बेळगुंदी) विद्या शिंदोळकर (हिंदवाडी) आणि प्रकाश बाळू पाटील (विजयनगर) हे सर्वजण हुतात्मे झाले.
या सर्व हुतात्म्यांना दरवर्षी 1 जून रोजी अभिवादन करून कन्नड सक्ती विरुद्ध लढण्याचा आणि महाराष्ट्रात जाण्याचा निर्धार मराठी भाषिकांकडून व्यक्त केला जातो. त्यानुसार आज शनिवारी सकाळी हुतात्मा स्मारक हिंडलगा येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम गांभीर्याने पार पडला.
प्रारंभी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर आणि ज्येष्ठ समिती नेते राजाभाऊ पाटील यांनी त्याचप्रमाणे शहर महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे अध्यक्ष रणजीत चव्हाण -पाटील नेते रमाकांत कोंडुसकर व समितीचे लोकसभा उमेदवार महादेव पाटील यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
तसेच मान्यवरांच्या हस्ते स्मारकाचे पूजन करून हुतात्मा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी अमर रहे अमर रहे हुतात्मे अमर रहे, महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय असो, बेळगाव -कारवार -निपाणी -बिदर -भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहण्यात आल्यानंतर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, शहर समितीचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील, समिती नेते रमाकांत कोंडस्कर, आर. एम. चौगुले, खानापूरचे माजी आमदार दिगंबर पाटील, ॲड. अमर येळ्ळूरकर, मदन बामणे, लक्ष्मण होणगेकर, खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, रामचंद्र मोदगेकर, मुरलीधर पाटील, गोपाळ पाटील, आर. आय. पाटील, नितीन देसाई, ॲड. सुधीर चव्हाण, पांडुरंग पट्टण, शिवाजी राक्षे, सुनील अष्टेकर, यल्लाप्पा पाटील, प्रदीप अष्टेकर, माजी महापौर सरिता पाटील, माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, सुधा भातकांडे आदींनी हुतात्मा स्मारकाला पुष्पहार व फुले वाहून अभिवादन केले. यावेळी उपस्थित सर्वांनी दोन मिनिटे मौन बाळगून कन्नड सक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.
याप्रसंगी बोलताना मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी 1956 सालच्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासह शिवसेनेने 1969 साली केलेले आंदोलन आणि 1986 च्या कन्नड सक्तीविरोधातील आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या अशा सर्व ज्ञात -अज्ञात मंडळींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आज आपण येथे जमलो असल्याचे सांगितले. तसेच 1986 च्या कन्नड सक्ती विरोधातील आंदोलनाचा संदर्भ घेत त्यांनी आजच्या घडीला 2024 मध्ये महाराष्ट्र व कर्नाटकाची भूमिका पाहता एका बाजूने प्रचंड अन्याय आणि दुसऱ्या बाजूने अतिशय कोणत्याही प्रकारचा संबंध नाही अशा प्रकारचं महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्ष, ही अत्यंत खेदजनक आणि लाजिरवाणी गोष्ट असल्याचे स्पष्ट केले. परवाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व राज्यकर्ते सीमाभागात आले होते.
त्यापैकी एकानेही बेळगाव सोडून इतर ठिकाणी महाराष्ट्राचा जयघोष केला आहे असे मला तरी वाटत नाही मराठी भाषेच्या, येथील मराठी माणसांच्या अन्यायावर एकही नेता या संपूर्ण निवडणूक कालावधीमध्ये बोललेला नाही हे आपल्या सर्वांचे दुर्दैव आहे आणि म्हणून त्यांना जाणीव करून देणं अत्यावश्यक आहे. या राज्यकर्त्यांसाठी आपल्या पक्षाशिवाय कोणीही मोठा नाही. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. प्रत्येकाचा पक्ष मोठा झाला आहे. कुठला सीमाप्रश्न? कुठले सीमावासीय? अशी परिस्थिती या नेत्यांनी आज आपल्या सर्वांची करून ठेवली आहे. तेंव्हा आपण आपल्या मधील एकी अभेद्य ठेवून सीमालढा जोमाने लढूया. आज आपण शपथ घेऊया की सीमाप्रश्न सुटेपर्यंत आणि मराठी भाषिकांवरील अन्याय दूर होईपर्यंत आपण सर्वांनी एक दिलाने एकजुटीने लढूया, असे आवाहन अष्टेकर यांनी केले. यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, समिती नेते रमाकांत कोंडुसकर, ॲड. अमर येळ्ळूरकर, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, समितीचे लोकसभेचे उमेदवार महादेव पाटील, नितीन देसाई आदींची हुतात्म्यांना आदरांजली वाहणारी भाषणे झाली. याप्रसंगी बेळगाव शहर व तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, महिला आघाडी, युवा आघाडी व युवा समितीचे पदाधिकारी, समिती कार्यकर्ते आणि मराठी भाषिक बहुसंख्येने उपस्थित होते.