बेळगाव लाईव्ह : गेल्या ६७ वर्षांपासून सीमाप्रश्नाची सोडवणूक आणि कर्नाटक सरकारच्या अत्याचाराची झळ सोसणाऱ्या मराठी भाषिकांना न्याय पद्धतीने लढा देऊनही यश मिळत नाही. यामागे मराठी भाषिकांशी आणि मराठी भाषिकांच्या महाराष्ट्र एकीकरण समितीशी प्रतारणा करणाऱ्या काही समिती नेत्यांचा हात असल्याचे सांगत समिती नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी समितीत असणाऱ्या काही विघ्नसंतोषी नेत्यांची चांगलीच कानउघाडणी केली.
कन्नडसक्ती आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी हिंडलगा हुतात्मा स्मारकाजवळ आयोजिलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. काही दुरंगी समिती नेत्यांमुळे समिती, मराठी भाषिक आणि सीमालढ्याला मरगळ आली असून समितीत राहून समितीच्या विरोधात काम करणाऱ्या नेत्यांची नांगी ठेवण्याची गरज असल्याचे स्पष्ट मत रमाकांत कोंडुसकरांनी व्यक्त केले.
आज अनेक समिती नेते समितीच्या प्रवाहात वरवर दाखविण्यासाठी कार्यरत आहेत. परंतु त्यांच्याच कुटुंबातील सदस्य राष्ट्रीय पक्षात कार्यरत आहेत. यामुळे आपण ज्यांच्यावर नेते म्हणून विश्वास ठेवतो त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबाचाच विश्वास नसल्याचे कोंडुसकर म्हणाले.
ते पुढे म्हणाले, मागीलवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत समितीला आलेले अपयश हे लाजिरवाणे आहे. ग्रामीण मतदार संघ, उत्तर मतदार संघ, दक्षिण मतदार संघ आणि खानापूर मतदार संघ.. या चारही मतदार संघात मराठी भाषिकांनी समितीची साथ सोडल्याचे दिसून येत आहे. खरेतर आपण समितीच्या माध्यमातून निवडणूक लढतो यामागे आपली लोकेच्छा कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारला दर्शविणे हि आहे. परंतु समितीमध्ये सुरु असलेल्या हीन दर्जाच्या राजकारणामुळे मराठी भाषिकही पाठ फिरवत असल्याचेच निकालावरून दिसून आले, हि दुर्दैवाची बाब असल्याचे कोंडुसकर म्हणाले.
समितीमध्ये असणाऱ्या काही स्वार्थी नेत्यांमुळे आज अशी परिस्थिती ओढवली असून याचा फटका मराठी भाषा, मराठी भाषिक समाज आणि सीमाप्रश्नावर होत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येक वर्षी हुतात्मा दिनी समिती नेते एकत्र येतात. भाषणे करतात. परंतु आपण जे बोलतो त्यावर कधीच कृती केलेली दिसून आली नाही. समिती नेते केवळ बोलण्यावर विश्वास ठेवतात कृती मात्र शून्य आहे, अशी टीकाही त्यांनी केली. समितीच्या लढ्याला बळ द्यायचे असेल तर तळागाळातून संघटन होणे, एकजूट होणे गरजेचे आहे. परंतु आज समितीमध्ये सुरु असलेले वातावरण पाहिले तर हा हुतात्म्यांचा अवमानच ठरत असल्याचे ते म्हणाले.
ज्या लढ्यासाठी हुतात्म्यांनी हौताम्य पत्करले त्या हुतात्म्यांच्या कुटुंबीयांची शोकांतिका आपण कधी लक्षात घेतली का? त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली का? आज सीमाभागात सुरु असलेल्या या गोष्टींमुळे हुतात्म्यांना शांती मिळेल का? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.
सीमालढा जिवंत ठेवून सीमाभागातील लाखो मराठी भाषिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि हुतात्म्यांचे हौतात्म्य सत्कारणी लावण्यासाठी आपल्यात एकजूट राखणे आवश्यक आहे. निवडणुकीच्या वेळी आपण समितीसोबत असल्याचे भासवून राष्ट्रीय पक्षांकडून घबाड घेऊन आपल्याच उमेदवारांचे पाय खेचायचे, अशी वृत्ती काही स्वार्थी समिती नेत्यांनी राखली आहे. हि परिस्थिती बदलली नाही तर हुताम्यांचा शाप नक्कीच भोवेल, शिवाय आपल्या समाजाचे मोठे नुकसान होईल, असे रमाकांत कोंडुस्कर म्हणाले.
हे व्यासपीठ राजकारणाविषयी बोलण्याचे नव्हे परंतु ज्या गोष्टीसाठी मराठी भाषिकांनी हौतात्म्य पत्करले त्यांचे हौतात्म्य व्यर्थ जाऊ नये यासाठी कानउघाडणी करणे आणि सत्यपरिस्थिती मांडणे अत्यंत गरजेचे आहे, असे स्पष्टीकरणही रमाकांत कोंडुस्कर यांनी दिले.