Wednesday, June 26, 2024

/

बेळगाव विमानतळाला पुन्हा सोनेरी दिवस येणार का?

 belgaum

बेळगाव लाईव्ह: बेळगावमधील लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे बेळगाव विमानतळाला उतरती कळा आल्याचा आरोप जनतेतून होत आला आहे. दरम्यान बेळगावच्या विमानतळावरून विविध ठिकाणी उड्डाण व्हावे, अशी मागणी जनतेतून होत असतानाच स्टार एअरलाईन्स या कंपनीने आणखी दोन ठिकाणची सेवा बंद केली आहे. यामुळे बेळगाव विमानतळावरून विविध शहराला जोडणाऱ्या एकूण १२ ठिकाणांपैकी २ ठिकाणची उड्डाणे बंद करण्यात आल्याने हि संख्या १० वर येऊन पोहोचली आहे.

बेळगावमधील अनेक प्रकल्प आणि योजना हुबळी – धारवाड ला वळविण्यात आल्याचा आरोप अनेक दिवसांपासून सुरु आहे. यापैकीच एक असलेली म्हणजे विमानतळावरील उडाण हि योजना!

सर्वसामान्यांना कमीतकमी दरात विमानप्रवास करता यावा यासाठी निवडक आणि ठराविक अंतरावरील उड्डाणांसाठी विशेष दरात विमानसेवा सुरु करण्यात आली. मात्र लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे हि योजना बेळगाव विमानतळावरून बंद झाली. आता मूळचे हुबळीचे असणारे आणि सध्या बेळगाव लोकसभा मतदार संघावर खासदार म्हणून निवडून आलेले जगदीश शेट्टर याकडे लक्ष देतील का? असा प्रश्न बेळगावकर उपस्थित करत आहेत.

 belgaum

स्टार एअरने बेळगाव ते सुरत आणि बेळगाव ते किशनगड (अजमेर)या मार्गावरील सेवा बंद केली आहे. बेळगावच्या रहिवाशांना सोयीस्कर कनेक्शन देणारी ही उड्डाणे या क्षेत्रांसाठी उडान योजनेच्या समाप्तीनंतर संपुष्टात आली. सध्या, बेळगाव विमानतळ अहमदाबाद (स्टार एअर), जोधपूर (स्टार एअर), मुंबई (स्टार एअर), तिरुपती (स्टार एअर), नागपूर (स्टार एअर), जयपूर (स्टार एअर), बेंगळुरू (इंडिगोची 2 उड्डाणे), हैदराबाद (इंडिगो), नवी दिल्ली (इंडिगो), भुज (अहमदाबाद मार्गे, स्टार एअर) आदी ठिकाणी विमानसेवा सुरु आहे.

बेळगाव विमानतळावर विमानतळ-एअरबस,टर्मिनल 2 (T2) चे बांधकाम सुरु आहे. 322 कोटी रुपयांच्या खर्चातून बेळगाव विमानतळाचा विकास करण्यात येत आहे. या नवीन टर्मिनलमुळे प्रवाशांची क्षमता वाढेल आणि विमानतळावरील सेवा सुधारतील अशी अपेक्षा आहे. दरम्यान सातत्याने विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून चेन्नई आणि पुण्यासाठी थेट उड्डाणे सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. विमानतळाची क्षमता पूर्णतः साकार करण्यासाठी, मोठ्या शहरांशी उत्तम कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्याची आवश्यकता आहे.Bgm airport shetter

अलीकडेच मोपा या गोवा सरकारच्या विमानतळावरून अधिकाधिक ठिकाणी विमानसेवा सुरु करण्यात आल्याने बेळगावच्या विमानतळावर याचा परिणाम जाणवू लागला आहे. ट्रू जेटने बेळगाव विमानतळावरून उडाण सेवा बंद केल्याने बेळगाव विमानतळाला फटका बसला आहे. या कारणांमुळे बेळगावमधून विविध ठिकाणी विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे.

या सर्व एकंदर बाबी लक्षात घेता बेळगाव विमानतळावर उडाण सेवा पूर्ववत करण्यात यावी, अधिकाधिक ठिकाणी विमानसेवा सुरु करून बेळगाव विमानतळाचा दर्जा वाढविण्यात यावा, प्रवाशांच्या मागण्या पूर्ण करून बेळगाव विमानतळाच्या माध्यमातून प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यात याव्यात, अशा मागण्या नवनिर्वाचित खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे करण्यात येत असून या आवाहनाला खासदार कशापद्धतीने प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.