बेळगाव लाईव्ह :अलिकडे कर्नाटक राज्यात काँग्रेस पक्षाचे अस्तित्व जेंव्हा संपत आले होते त्यावेळी शेतकरी त्यांच्या पाठीशी उभे राहिले हे लक्षात घेऊन तसेच बेळगाव ही कर्नाटकची दुसरी राजधानी आहे हे सिद्ध करण्यासाठी सतीश जारकीहोळी यांना मुख्यमंत्री करावे अशी सर्व शेतकरी संघटनांची मागणी असून ती पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रीय रयत संघाचे नेते प्रकाश नायक यांनी दिली.
शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आज गुरुवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. प्रकाश नायक म्हणाले की, शेतकऱ्यांची कृषी उत्पादने, एमएसपी वगैरेंसाठी स्वामीनाथन आयोगाचा जो अहवाल आहे. त्याद्वारे देशातील 80 टक्के शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांच्या हिताच्या गोष्टींची शिफारस सरकारकडे करण्यात आली आहे.
त्या शिफारशींची तात्काळ दखल घेऊन प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. त्याचप्रमाणे बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाची सध्याची इमारत पाडून त्या ठिकाणी नवी इमारत उभारण्याचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पावर सुमारे 300 कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च केली जाणार आहे. खरे तर जिल्हाधिकारी कार्यालय इमारत कांही मोडकळीला आलेली नाही. ही ब्रिटिश कालीन दगडी इमारत चांगली मजबूत आहे. ती आणि तिच्या आसपासच्या कांही अन्य मजबूत इमारती पाडून नवी इमारत बांधण्याची सध्या तरी काहीच गरज नाही.
त्याऐवजी या इमारतीच्या प्रकल्पावर जो 300 कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे, त्याऐवजी बेळगाव जिल्ह्यातील अत्यंत त्रासात असलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, अशी मागणी आम्ही केली होती. मात्र त्याची पूर्तता करण्यात प्रशासकीय व्यवस्था पूर्णपणे अपयशी ठरल्यामुळे आम्ही त्यासाठी आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहोत. याखेरीज स्वातंत्र्यानंतर बेळगाव जिल्ह्याला केंद्र व राज्य पातळीवर जितकं राजकीय प्रतिनिधित्व मिळायला हवं होतं तितकं ते मिळालेले नाही.
आता केंद्रात नवे सरकार आले आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी या सरकारच्या मंत्रिमंडळात बेळगाव जिल्ह्यातील भाजपच्या खासदारांना स्थान दिले जावे, अशी शेतकरी संघटनांची मागणी असल्याचे नायक यांनी सांगितले.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, “शेतकऱ्यांच्या सोबत मी लहानाचा मोठा झालो असल्यामुळे मी त्यांच्या सोबत राहणार” असे अभिमानाने सांगणारे आणि दुष्काळी परिस्थितीमध्ये आपल्या साखर कारखान्याच्या माध्यमातून 25 लाख टन उसाचे गाळप करणारे बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीशअण्णा जारकीहोळी यांना उपमुख्यमंत्री नव्हे तर थेट मुख्यमंत्री करावे. या पद्धतीने केंद्र व राज्य सरकारमध्ये बेळगाव जिल्ह्याला प्रतिनिधित्व दिले जावे. विद्यमान मुख्यमंत्र्यानी लक्षात घेतले पाहिजे की अलिकडे राज्यात त्यांच्या पक्षाचे अस्तित्व जेंव्हा संपत आले होते त्यावेळी शेतकरी त्यांच्या पाठीशी उभे राहिले, अहिंदने त्यांना साथ दिली. त्यामुळे कर्नाटकात त्यांचे सरकार सत्तेवर आले.
हे ऋण फेडण्यासाठी सतीश जारकीहोळी यांनाच मुख्यमंत्री करावे, अशी शेतकरी संघटनांची मागणी आहे. हे राजकारण नाही तर बेळगावला जे राज्याची दुसरी राजधानी मानलं जातं ते सिद्ध करण्यासाठी असे करणे आवश्यक आहे. बेळगावच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी तसेच बेळगावच्या विकासासाठी आम्ही हा पर्यायी मार्ग सुचवला आहे. या मार्गाचा गांभीर्याने विचार करून त्याची अंमलबजावणी केली जावी असे सांगून आमच्या या मागणीकडे पूर्वीप्रमाणे दुर्लक्ष केल्यास थेट तळातील ग्रामपंचायत पातळीपासून, शेतकऱ्यांच्या घरापासून चळवळ हाती घेतली जाईल. पुढे शेतकऱ्यांना संघटित करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आम्ही सरकार आणि संबंधित व्यवस्थेला देत आहोत, असे प्रकाश नायक यांनी शेवटी स्पष्ट केले. याप्रसंगी राष्ट्रीय रयत संघाचे (मूळ कर्नाटक राज्य रयत संघ) अन्य पदाधिकारी उपस्थित होते.