बेळगाव लाईव्ह : पावसाळा सुरु झाला कि लेंडी आणि बेळ्ळारी नाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना फटका बसतो. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी आणि नाल्यांची सफाई तातडीने करून समस्या मार्गी लावावी, अशा सूचना कर्नाटकचे कृषिमंत्री एच. टी. प्रभाकर यांनी बेळगाव महानगरपालिकेला दिल्या आहेत.
यासंदर्भातील पत्र बेळगाव महानगरपालिकेला देण्यात आले आहे. त्याची प्रत शेतकरी नेते नारायण सावंत यांना देखील पाठवण्यात आली आहे.
गेली २० वर्षे बेळगाव शेतकरी संघटना नाला आणि महामार्गामुळे उद्भवणाऱ्या समस्यांसंदर्भात न्याय मागत आहे. सरकार, सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी आजवर या समस्यांची आणि शेतकऱ्यांची दखल घेतली नाही. शेतकरी नेते नारायण सावंत यांनी देखील यासंदर्भात महापालिका प्रशासन आणि सरकारशी पत्रव्यवहार केला होता.
सातत्याने मागणी करूनही शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रति एकर १ लाख रुपये भरपाई देण्याची मागणी केली आहे.
यापार्श्वभूमीवर कर्नाटकाच्या कृषी मंत्रालयाने याची दखल घेत बेळगाव महानगरपालिकेला सूचना केल्या असून नाल्याची सफाई करण्यात यावी, शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई देण्यात यावी तसेच शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्यात याव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
आता राज्याच्या कृषी मंत्रालयाने महापालिकेला लेंडी नाला आणि बळळारी नाल्यासंदर्भात सूचना केल्यानंतर देखील बेळगाव महापालिका यावर काय कारवाई करणार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार का याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.