Friday, December 27, 2024

/

युध्दपातळीवर राज्य ग्राहक आयोग खंडपीठ स्थापनेची मागणी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरात युध्दपातळीवर राज्य ग्राहक आयोगाचे खंडपीठ स्थापन केले जावे, अशी जोरदार मागणी अहिंद वकील संघटना बेळगावच्यावतीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे करण्यात आली आहे.

अहिंद वकील संघटनेतर्फे ॲड. एन. आर. लातूर यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्र्यांच्या नावे असलेले उपरोक्त मागणीचे निवेदन आज बुधवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

आपल्या मागणी संदर्भात प्रसिद्धी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ॲड. एन. आर. लातूर म्हणाले की, कर्नाटक राज्य ग्राहक आयोगाचे खंडपीठ बेळगावात स्थापन झाले पाहिजे या मागणीसाठी आम्ही गत दोन वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करून निवेदने देत आहोत. वर्षभरापूर्वी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पालक मंत्र्यांना निवेदन देऊनही याबाबत कोणतीच कार्यवाही झालेली नाही.

बेळगावमध्ये जिल्हा ग्राहक न्यायालय आहे. या ठिकाणी किमान 6000 पेक्षा अधिक खटले प्रलंबित आहेत. तसेच या ठिकाणी निकाली झालेले खटले पुढे बेंगलोरला जातात. त्यासाठी उत्तर कर्नाटकातील संबंधित खटल्यातील सर्व वादी -प्रतिवादींना प्रवासाचा वगैरे त्रास सहन करत बेंगलोरला जावे लागते. जनतेला हा त्रास होऊ नये यासाठी आम्ही जिल्हा पालकमंत्र्यांची भेट घेऊन बेळगावमध्ये ताबडतोब राज्य ग्राहक न्यायालय स्थापन केले जावे आणि उत्तर कर्नाटकातील जनतेची ही समस्या कायमची निकालात काढावी, अशा मागणी केली होती.

तसेच तशा आशयाचे निवेदनही दिले आहे. त्यांनी व जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या मागणीची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले आहे अशी माहिती देऊन आमची राज्य सरकारला विनंती आहे की त्यांनी बेळगावमध्ये त्वरेने राज्य ग्राहक आयोगाची स्थापना करावी, असे ॲड. लातूर यांनी सांगितले.Sujit

बेळगाव भ्रष्टाचार निर्मूलन परिवारचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी यावेळी बोलताना बेंगलोरमध्ये असलेले राज्य ग्राहक न्यायालय बेळगावमध्ये आणणे गरजेचे आहे असे सांगितले. सदर न्यायालय बेळगावात स्थापन व्हावे यासाठी ॲड. लातूर करत असलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत. या ठिकाणच्या ग्राहक न्यायालयात निकाली झालेले खटले पुढे राज्य ग्राहक न्यायालयात बेंगलोरला जातात.

त्या ठिकाणी ये-जा करणे येथील वादी -प्रतिवादींच्या दृष्टीने त्रासदायक, तसेच बऱ्याचदा नुकसानीचेही ठरत आहे. तेंव्हा राज्य ग्राहक न्यायालय बेळगाव व्हावे या वकील संघटनेच्या मागणीला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे, असे मुळगुंद यांनी स्पष्ट केले. यावेळी अहिंद वकील संघटनेचे सदस्य वकील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.