बेळगाव लाईव्ह ; रद्दीतून बुद्धीकडे या उपक्रमांतर्गत विद्या आधार या संस्थेकडून गोळा करण्यात आलेल्या रद्दीची विक्री करून त्यातून मिळालेल्या रककमेतून फिज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यात आली आहे.
शांताई च्या विद्या आधार या उपक्रमांतर्गत दरवर्षी रद्दी गोळा करण्यात येते त्यातून निधी उभारला जातो.शहरातील शिक्षणासाठी समर्पित विद्या आधार फाउंडेशन या संस्थेने जुन्या पेपरच्या रद्दीतून उभारलेल्या निधीचा वंचित विद्यार्थ्यांसाठी विनियोग करण्याचा आपला स्तुत्य उपक्रम कुडची येथील भरतेश पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये नुकताच राबविला.
या उपक्रमांतर्गत बेळगावमधील विविध महाविद्यालयांतील पात्र विद्यार्थ्यांना 80,000 रुपयांच्या भरीव रकमेचे वितरण करण्यात आले.
सदर उपक्रमात समुदाय सदस्य आणि शिक्षकांचा उस्फुर्त सहभाग होता. विद्या आधार मधील प्रमुख व्यक्तिमत्व माजी महापौर विजय मोरे यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना प्रत्येकाने आमच्या फाउंडेशनसाठी टाकाऊ कागदाचे योगदान द्यावे, असे आवाहन केले. ते म्हणाले की, टाकाऊ कागद रद्दी पेपर मधून निधी उभारून तो वंचित विद्यार्थ्यांसाठी खर्च करण्याचा आमचा हा उपक्रम गेल्या 12 वर्षापासून सुरू असून जवळपास 450 हून अधिक विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरला आहे.
“जुनी कागदपत्रे, पुस्तके आणि वर्तमानपत्रे दान केल्याने आमची खात्री आहे की अधिकाधिक विद्यार्थ्यांना आर्थिक अडथळ्यांशिवाय त्यांचा अभ्यास करण्याची संधी मिळेल असा विश्वास मोरे यांनी व्यक्त केला. भरतेश ग्रुपने विद्या आधार फाउंडेशनला सुमारे 3 टन जुनी कागदपत्रे, पुस्तके आणि वर्तमानपत्रांची महत्त्वपूर्ण देणगी दिली आहे. ज्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ घेता येईल, असे त्यांनी पुढे सांगितले.
याप्रसंगी भरतेश संस्थेचे विनोद दोडण्णावर, अशोक दंडवडे, श्रीपाल केंपळापुरे, शिशिकांत लेंडगे, अनुराधा मॅम, श्रीकांत कोकणे कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. निधी वितरण उपक्रमाचे औचित्य साधून विद्या आधार मंडळाचे सदस्य विनायक बोंगाळे, ॲलन विजय मोरे, गंगाधर पाटील, कोमल श्रीसात आणि विश्वास पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
शैक्षणिक निधीमध्ये टाकाऊ कागदांचा पुनर्वापर करण्याचा विद्या आधार फाउंडेशनचा अभिनव दृष्टीकोन केवळ पर्यावरणालाच आधार देत नाही तर शिक्षणाद्वारे जीवनात परिवर्तन घडवून आणतो.