बेळगाव लाईव्ह : +92 या पाकिस्तानी कोडसह गेल्या अनेक दिवसांपासून फोन कॉल येऊन धमाकूळ घातला जात आहे. हा फोन घोटाळा संपूर्ण भारतातील वापरकर्त्यांना लक्ष्य करून फसवणूक होत असल्याची माहिती उघड झाली असून या क्रमांकावरून आलेल्या फोन कॉल वरून संबंधित गुन्हेगार पोलीस अधिकारी म्हणून भासवून अनेकांची फसवणूक केली जात आहे.
आपण गुन्हेगारी कृत्यामध्ये सामील असल्याचे सांगत लुबाडणूक केली जात असून यासंदर्भातील तक्रारींमध्ये मोठी वाढ झाल्याचे एका निरीक्षणात पुढे आले आहे. या घोटाळ्यापासून आणि फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत माहिती असणे आवश्यक आहे.
पोलीस अधिकारी असल्याचे सांगत मनी लाँड्रिंग, ड्रग तस्करी किंवा दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये आपण अडकल्याचे भासवून धमकी देण्याचा प्रकार सुरु आहे. विशिष्ट खात्यात पैसे हस्तांतरित करून यापासून बचाव करण्याची ऑफरदेखील दिली जाते. याचबरोबर संवेदनशील वैयक्तिक माहिती देण्याचीही गळ घालून संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यातून रक्कम गायब झाल्याचेही अनेक प्रकार पुढे येत आहेत.
याप्रकारच्या तक्रारींमुळे दूरसंचार विभागाने मोबाईल वापरकर्त्यांना सावधानतेचा इशारा दिला असून +92 या क्रमांकावरून सुरु होणाऱ्या फोन कॉल्स ना प्रतिसाद देऊ नये, कोणत्याही प्रकारची वैयक्तिक माहिती अथवा ओटीपी शेअर करू नये, कोणत्याही धमक्यांना, अफवांना बळी पडू नये, गोंधून किंवा घाबरून न जाता तातडीने सीईएन पोलीस स्थानकाशी अथवा नजीकच्या पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
+92 या नंबरवरुन कॉल आला आणि सरकारी अधिकारी असल्याचे सांगत असल्यास तरी देखील कोणतीही माहिती देऊ नका. टेलिकॉम विभागांची तोतयागिरी करणारे कॉलर मोबाईल वापरकर्त्यांना धमकावत आहेत. त्यांचे नंबर डिस्कनेक्ट केले जातील किंवा काही बेकायदेशीर कामांमध्ये त्यांच्या नंबरचा गैरवापर केला जात आहे. असे सांगून हे सायबर गुन्हेगार निष्पाप नागरिकांना धमकावत आहेत.
अशाप्रकारच्या फोन कॉल्सची तक्रार करण्यासाठी संचार साथी पोर्टलवर (www.sancharsaathi.gov.in) ‘चक्षु अंतर्गत – रिपोर्ट सस्पेक्टेड फ्रॉड कम्युनिकेशन्स’ सुविधेचा वापर करावा, तसेच सायबर-क्राइम हेल्पलाइन क्र. 1930 वर किंवा www.cybercrime.gov.in ला भेट देण्याचे सुचविण्यात आले आहे.