बेळगाव लाईव्ह : बेळगाव विमानतळावरून एकीकडे विमानफेऱ्या रद्द केल्या जात आहेत तर दुसरीकडे प्रवासीसंख्या मात्र वाढत असून बेळगाव विमानतळावरून मे महिन्यात 30 हजारांचा टप्पा ओलांडत प्रवासी संख्येत 3.17 टक्क्यांनी वाढ होऊन तब्बल 32,045 प्रवाशांनी विमानप्रवास केला आहे.
सध्या बेळगावमधून इंडिगो व स्टार एअर या दोन कंपन्या विमानसेवा देत आहेत. इंडिगोकडून बेंगळूरला दररोज दोन विमाने तर दिल्ली व हैदराबाद येथे रोज एक विमान प्रवास करते. स्टार एअर अहमदाबाद, मुंबई, नागपूर, जोधपूर, जयपूर व तिरुपती या सहा शहरांना विमानसेवा देते.
एप्रिलमध्ये 31,086 प्रवाशांनी विमानप्रवास केला. मेमध्ये 32,045 प्रवाशांनी विमानप्रवास केल्याची नोंद आहे. या महिन्यात 2.3 मेट्रिक टन कार्गो वाहतूक केली आहे. प्रवासी संख्येसोबतच मालवाहतूकही वाढत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
प्रवासी संख्या वाढत चालल्याने नवीन विमानफेऱ्या सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. मे महिन्यातील प्रवाशांच्या संख्येत झालेली वाढ पाहता बेळगाव विमानतळावरून पुन्हा विविध ठिकाणी विमानफेऱ्या सुरु केल्या जातील का? याकडे लक्ष वेधले आहे.