बेळगाव लाईव्ह:बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्ड (बीसीबी) मधील एक धक्कादायक लाचखोरी घोटाळा उघडकीस आला असून ज्यामध्ये ‘मजूर’, ‘दाई’, ‘कुली’ आणि ‘चौकीदार’ यांसारख्या क्षुल्लक पदांसाठीच्या उमेदवारांनी 15 ते 25 लाख रुपयांपर्यंत लाच दिल्याचा आरोप आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) नुकत्याच केलेल्या आपल्या एफआयआरमध्ये ही माहिती उघड करत एक महत्त्वपूर्ण खळबळजनक भरती घोटाळा प्रकाशात आणला आहे.
सीबीआयचा तपास आणि आरोप : काल शुक्रवारी सीबीआयच्या सार्वजनिकरित्या जाहीर झालेल्या एफआयआर नुसार बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे 5 अधिकारी आणि 14 उमेदवार लाचखोरी प्रकरणात अडकले आहेत.
मागील 2022-23 च्या भरती प्रक्रियेतील भ्रष्टाचार आणि अनियमिततेबद्दल बोर्ड सदस्याच्या तक्रारीवरून सीबीआयने गेल्या वर्षी प्राथमिक चौकशीला सुरुवात केली होती. भरती अनियमिततेबाबतच्या
सीबीआय निष्कर्षानुसार 2022-23 या कालावधीत मेकॅनिक, सहाय्यक स्वच्छता निरीक्षक (असि. सॅनिटरी इन्स्पेक्टर), कुली, माळी, शिपाई आणि दाई यासह विविध पदांसाठी 31 उमेदवारांची नेमणूक करण्यात आली होती.
संबंधित अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक महालिंगेश्वर वाय. तालुकदार, संगणक प्रोग्रामर बसवराज एस. गुडोदगी, डेटा एन्ट्री ऑपरेटर प्रकाश सी. गौंडाडकर, मुख्याध्यापक परशराम एस. बिर्जे आणि सहाय्यक शिक्षक उदय एस. पाटील यांनी तत्कालीन सीईओंच्या निर्देशानुसार परीक्षा प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डावर मुख्य आरोप आणि मयत सीईओंची भूमिका : सीबीआयने कॅन्टोन्मेंट बोर्डाचे दिवंगत सीईओ आनंद के. यांच्यावर भरती प्रक्रियेचे नियंत्रण आणि देखरेख करणारे प्रमुख व्यक्ती असल्याचा आरोप केला आहे. आनंद के. यांनी अन्य पाच अधिकाऱ्यांच्या संगनमताने निवड प्रक्रियेत फेरफार करण्यासाठी नोकरीसाठी इच्छुक असलेल्यांकडून 15 ते 25 लाख रुपयांची लाच मागितली आणि स्वीकारली.
फेरफार आणि अनुचित व्यवहार : या भ्रष्ट पद्धतींमुळे अधिकाऱ्यांच्या पसंतीस उतरलेल्या उमेदवारांची अयोग्य निवड झाल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. भरतीसाठीची परीक्षा अनेक उमेदवारांना ज्ञात नसलेल्या इंग्रजी भाषेमध्ये घेण्यात आली.
परिणामी लाच परवडत नसलेल्या पात्र उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आले. पक्षपात आणि प्रादेशिक पक्षपात : पुढील आरोपांवरून असे सूचित होते की देशभरातील उमेदवार परीक्षेला बसले होते. तरीही निवडलेले सर्व जण बेळगाव किंवा जवळपासच्या भागातील होते. निवडलेले अनेक उमेदवार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी संबंधित किंवा ओळखीचे होते.