बेळगाव लाईव्ह :बेळगाव महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी आज प्रभाग क्र. 5 ला अचानक भेट देऊन विकास कामांच्या दर्जाची पाहणी केली. तसेच स्थानिक जनतेशी चर्चा करून काम दर्जेदार होण्यासाठी कंत्राटदाराला सूचना केल्या.
महापालिका आयुक्त अशोक दुडगुंडी यांनी आज शुक्रवारी सकाळी प्रभाग क्र. 5 मध्ये अचानक पाहणी दौरा करून तेथील गटारी, ड्रेनेज पाईपलाईन, जलवाहिन्या जोडणी आदी कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिकांशी चर्चा करून त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या.
प्रारंभी प्रभागाचे नगरसेवक अफरोज शकील मुल्ला आणि काकर गल्ली जमात सदस्यांनी आयुक्तांसह उपस्थित अन्य अधिकारी व अभियंत्यांचे स्वागत केले. आयुक्तांच्या पाहणी दौऱ्याप्रसंगी एल अँड टी कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम खाते यांच्या अभियंते, कंत्राटदार वगैरेंचा समावेश असलेल्या पथकालाही पाचारण करण्यात आले होते.
आपल्या पाहणी दौऱ्यादरम्यान आयुक्त दुडगुंटी यांनी युडीजी लाईन, पाण्याची पाईपलाईन, बोअरवेल पाईप लाईनशी संबंधित काँक्रीटचे काम हाती घेण्यापूर्वी त्या संदर्भातील स्थानिकांच्या तक्रारींची दखल घेण्याची सूचना अधिकारी व अभियंत्यांना केली.
याप्रसंगी नगरसेवक अफरोज शकील मुल्ला यांच्यासह सहाय्यक कार्यकारी अभियंता सचिन कांबळे, कनिष्ठ कार्यकारी अभियंता अशोक नायक, एल अँड टी सहाय्यक कार्यकारी अभियंता सोलापुरे, रवी, एसएमईसी टीम पाटील, आबिद शेख, जमात अध्यक्ष मोहम्मद गौसे शेख, रफिक बेपारी, आकीब बेपारी, आसिफ बागवान, काँग्रेस सेवादल अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते शकील मुल्ला आदी उपस्थित होते.