बेळगाव लाईव्ह : वडगाव, आनंद नगर, दुसरा क्रॉस येथील नाल्यावर अतिक्रमण केलेल्या घरांवर महानगरपालिकेकडून जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण हटविण्यात आले. मनपा अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली आहे.
मात्र सदर नाला हा या भागातून जात नसून खालच्या बाजूने गेल्यामुळे या भागात करण्यात आलेली हि कारवाई कोणाच्या तरी दबावाखाली येऊन करण्यात येत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.
भाग्यनगर, आदर्षनगरपासून सुरुवात झालेला हा नाला पूर्वी शंकर चौगुले यांच्या शेतातून सुरु झाला होता. सर्व्हे क्रमांक २१५/६ मधून खालच्या भागातून वाहणाऱ्या या नाल्याचा येथील घरांशी कोणताही संबंध नाही.
या भागात शहरात सुरु असलेल्या ड्रेनेजच्या कामासाठी आलेल्या मागासवर्गीय नागरिकांना घरे देण्यात आली होती. गेल्या अनेक वर्षांपासून हे गरीब लोक याठिकाणी संसार थाटून बसले होते. मात्र आज अचानक हि कारवाई करण्यात आल्याने यांचे संसार उघड्यावर पडले आहेत.
ज्याठिकाणी कारवाई होणे गरजेचे आहे, त्याठिकाणी दुर्लक्ष करून गरिबांच्या घरावर जेसीबी चालविण्यात आली आहे. याच नाल्यावर एका मोठ्या बिल्डरने चार मजली इमारत बांधली आहे. हि इमारत अनधिकृत आहे. परंतु याकडे दुर्लक्ष करून नाल्यावर अतिक्रमण करण्यात आल्याचे कारण पुढे करून कोणतीही नोटीस न देता आज हि कारवाई करण्यात आली आहे.
सीडीपीनुसार हा नाला १४ फूट होता मात्र ५ फुटांची गटर बांधून नाल्याचे बांधकाम झाल्याचे भरविण्यात आले आहे. याकडे जिल्हा पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी गांभीर्याने लक्ष पुरवावे, अशी मागणी माजी नगरसेवक अनिल पाटील आणि नागरिकांनी केली आहे.