बेळगाव लाईव्ह :चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, किंवा भाजप कार्यकर्ते अथवा हिंदू पराभूत झाले नाहीत तर फक्त अण्णासाहेब जोल्ले हे त्यांच्या मस्ती व अहंकारामुळे पराभूत झाले आहेत, असे स्पष्ट परखड मत श्रीराम सेनेचे संस्थापक -राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी व्यक्त केले.
शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आज शनिवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुतालिक म्हणाले की, चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात आपल्या कार्यकर्त्यांशी सहकार्याने न वागणारे अण्णासाहेब जोल्ले हरले आहेत. भाजप हरलेले नाही. आपल्या मतदारसंघात काहीही काम न केलेली मुजोर, भ्रष्ट व्यक्ती म्हणजे अण्णासाहेब जोल्ले होय. या व्यक्तीने भाजपच्या नावावर निवडून आल्यानंतर आपल्या बँका, आपले बँक बॅलन्स, आपले पेट्रोल पंप वाढवले, जमीन -मालमत्ता वाढवली आहे.
कार्यकर्त्यांचे सुखदुःख कष्ट, मतदारसंघाचा विकास वगैरे काहीच त्यांनी केलेलं नाही. त्यामुळेच कार्यकर्ते आणि मतदार त्यांना कंटाळले असावेत. त्यामुळे तेथे भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, किंवा भाजप कार्यकर्ते अथवा हिंदू पराभूत झाले नाहीत तर फक्त अण्णासाहेब जोल्ले हे त्यांच्या मस्ती व अहंकारामुळे पराभूत झाले आहेत. मला विश्वास आहे की पुढच्या वेळी याचे चोख उत्तर भाजप निश्चितपणे देईल.
रेणुकास्वामी खुन प्रकरणात अडकलेला कन्नड अभिनेता दर्शन याच्याबद्दल बोलताना दर्शन असो किंवा इतर कोणीही मोठी व्यक्ती असो चुक ती चुकच, खून तो खूनच. त्यामुळे अशा बाबतीत कोणीही असेना त्यांना क्षमा न करता योग्य शिक्षा दिली गेली पाहिजे. अन्यथा लोकांचा पोलिस आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडेल. त्यामुळे या प्रकरणातील दोषींना शिक्षाही झालीच पाहिजे, असे मुतालिक यांनी स्पष्ट केले. अभिनेता दर्शन याच्या सुटकेसाठी मोठ्या वकिलांकडे धाव घेणाऱ्या त्याच्या पत्नीने प्रथम चित्रदुर्गला जाऊन मयत मध्यमवर्गीय युवक रेणुकास्वामी याची पत्नी, लहान मुल आणि आई-वडिलांवर कोणते आभाळ कोसळले आहे हे पहावे.
आपल्या नवऱ्याच्या कृत्यामुळे त्यांच्यावर काय परिस्थिती ओढवली आहे हे तिने स्वतःच्या डोळ्यांनी पहावे. खरे तर तिने वकिलावर लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा त्या कुटुंबाला लाख -दोन लाख रुपये दिले पाहिजेत, असे मत व्यक्त करून या प्रकरणात रेणुकास्वामीच्या कुटुंबीयांना निश्चितपणे न्याय मिळेल, असा विश्वास प्रमोद मुतालिक यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले. पत्रकार परिषदेस श्रीराम सेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.