बेळगाव लाईव्ह : अंधश्रध्दा हा एक मानसिक दुबळेपणा आहे. विज्ञानाच्या युगातील अशिक्षितपणाचे उदाहरण म्हणजे अंधश्रद्धा असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. परंतु बेळगावमध्ये अलीकडे अंधश्रद्धेच्या माध्यमातून वाढलेले करणीबाधा, उतारे टाकणे हे प्रकार पाहता अशिक्षितांपेक्षा सुशिक्षितांचीच अधिक संख्या यात दिसून येते आहे.
शेतशिवारांपासून रस्ते आणि रस्त्यांवरून चक्क सरकारी कार्यालयातही अलीकडे काळी जादू, करणी, उतारे टाकणे असे प्रकार सर्रास सुरु झाले आहेत. यामागे कुणाचा हात आहे? हे कळण्या आधीच अफवांचे पीक पसरते. परंतु याच्या मुळाशी पोहोचणे शक्य होत नाही. पण विज्ञानाच्या युगातील ‘उपरवाला’ मात्र याचा शोध घेण्यात यशस्वी झाला असून बेळगावमध्ये गुरुवारी उद्यमबाग येथील एका हॉटेलनजीक घडलेल्या करणीबाधेच्या प्रकारावरचा पडदा उघडण्यात ‘उपरवाल्याला’ यश आले आहे!
यादव कॉलनी अनगोळ येथील एका हॉटेलनजीक काल रात्री उतारा टाकण्यात आला. हा प्रकार पाहून सर्वसामान्य माणूस बिथरून जाईल. मात्र यामागे नक्की कुणाचा हात आहे? हा प्रकार का आणि कशासाठी करण्यात आला? बेळगाव शहर परिसरात विविध ठिकाणी होणाऱ्या अशाच प्रकारामागे एकच व्यक्ती आहे कि अशा प्रवृत्तीच्या अनेक व्यक्ती आहेत हा प्रश्न पडला असतानाच याच हॉटेलच्या परिसरात असणाऱ्या सीसीटीव्हीत उतारा टाकणारे कैद झाले.
ज्या ठिकाणी उताऱ्याचे साहित्य टाकण्यात आले त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका चारचाकी आलिशान वाहनातून हा प्रकार घडल्याचे दिसून आले. वाहनाच्या नंबर प्लेटवरून वाहनचालकाचा माग काढून अखेर उताऱ्याचे साहित्य त्याच व्यक्तीला उचलण्यास भाग पाडले गेले आणि हा प्रकार करणाऱ्या व्यक्तींना इशाराही देण्यात आला.
शासकीय कार्यालयात काम करणारा कारमधून फिरणारा एक व्यक्ती आणि त्याच्यासोबत असलेली एक महिला या दोघांनी त्या हॉटेल परिसरात तो तो उतारा टाकला होता तो सीसीटीव्ही नेमका कैद झाला आणि त्यानंतर टाकलेला ना तो उतारा काढून टाकावयास भाग पाडण्यात आले.
मागास विचार आणि अशिक्षितपणामुळे काहीजण अंधश्रद्धेतून बाहेर पडत नाहीत, हि वस्तुस्थिती आहे. परंतु भारतीय समाजात सुशिक्षित माणसेही त्याला बळी पडतात, हेच या प्रकारावरून दिसून येते. साधुसंतांची परंपरा लाभलेल्या आपल्या संस्कृतीची अशाप्रकारे अवहेलना करणे वेळीच थांबवून जागरूक होणे गरजेचे आहे. अन्यथा… ‘उपरवाला’ सब देखता है…..!