बेळगाव लाईव्ह :आता शाळा सुरू होताच कॅम्प, बेळगाव येथील हॉटेल वेलकमचे मालक अब्दुल गफ्फार शेख यांनी शाळकरी मुलांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी सक्रिय मदत करण्याचा आपला स्तुत्य उपक्रम पुन्हा सुरू केला आहे.
कॅम्प येथील खानापूर रोडवर सप्टेंबर 2022 मध्ये एका विशिष्ट ठिकाणी एका शालेय विद्यार्थ्याने शाळेत जात असताना आपला जीव गमावला होता.
सदर घटनेनंतर मागणी करूनही संबंधित ठिकाणी रहदारी पोलिसाची कायमस्वरूपी नियुक्ती झालेले नाही. त्यामुळे तेंव्हापासून कॅम्प येथील हॉटेल वेलकमचे मालक अब्दुल गफ्फार शेख त्या ठिकाणी थांबून रहदारी नियंत्रण करत शाळकरी मुलांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी मदत करतात.
आता नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्यामुळे शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत अब्दुल गफ्फार शेख यांनी आपला उपक्रम पुन्हा सुरू केला आहे.
सदर निःस्वार्थ कृतीमुळे केवळ समाजाचाच फायदा होत नाही तर कमी कर्मचारी असलेल्या पोलीस दलाचे ही काम हलके होत असल्यामुळे अब्दुल शेख यांचे सर्वत्र कौतुक व प्रशंसा होत आहे.