बेळगाव लाईव्ह : कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ केल्याने आज भाजपने राज्यव्यापी आंदोलन छेडले होते. यापार्श्वभूमीवर आज बेळगाव मध्ये भाजप नेत्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडून काँग्रेस सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.
खासदार जगदीश शेट्टर यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार अनिल बेनके आणि विविध भाजप नेत्यांच्या उपस्थितीत धर्मवीर संभाजी चौकात निदर्शने करण्यात आली. काँग्रेस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करून इंधन दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना खासदार जगदीश शेट्टर म्हणाले, राज्यातील काँग्रेस सरकारने हमी योजनांच्या निधीसाठी दरवाढ करून वसुली करण्याचे धोरण राबविले आहे. हमी योजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी जनतेची लूट करण्यात येत आहे.
राज्यातील तिजोरीमध्ये खणखणाट असून राज्यात झालेल्या पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे जनता दुसऱ्या राज्यात जाऊन पेट्रोल डिझेल खरेदी करत आहे. सरकारने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावली असून हे सरकार जनतेचे हित न जपता स्वार्थ जपत असल्याची टीका शेट्टर यांनी केली.
बेळगाव शहरासह ग्रामीण मंडळाच्या वतीनेही आंदोलन छेडण्यात आले. हिंडलगा फॉरेस्ट नाक्याजवळ भाजप ग्रामीण मंडळाच्या वतीने सुमारे 1 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले, कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार अस्तित्वात आल्यापासून एका पाठोपाठ एक जनविरोधी निर्णय घेत आहे. भाजपने सुरु केलेली किसान सन्मान निधी योजना काँग्रेस सरकारने बंद केली. वीजदरवाढ केली. दूध दरात वाढ झाली. मराठा समाजाच्या विकासासाठी देण्यात आलेल्या १०० कोटींमधील ५० कोटी काँग्रेसने काढून घेतले. उदगीर येथे शाहू महाराजांच्या समाधी विकासासाठी देण्यात आलेला ५ कोटी रुपयांचा निधी काढून घेण्यात आला. मागासवर्गीय समाजासाठी देण्यात आलेला निधी काढून घेऊन मुस्लिम समाजाला देण्यात आला.आता पेट्रोल डिझेल दरवाढ करण्यात आली. या सर्व दरवाढीमुळे जनतेला प्रचंड महागाईचा चटका बसत आहे. त्यामुळे हे सरकार सत्तेवर राहण्याच्या योग्यतेचे नसून या सरकारच्या काळात कर्नाटक राज्य दिवाळखोर होण्याच्या वाटेवर आहे, अशी टीका त्यांनी केली.
यावेळी माजी आमदार मनोहर कडोलकर, बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष युवराज जाधव, हिंडलगा ग्राम पंचायत माजी अध्यक्ष, सदस्य रामचंद्र मन्नोळकर, प्रदीप पाटील, कल्लापा सुतार, पंकज घाडी, यल्लेश कोलकार, भाग्यश्री कोकितकर, नारायण पाटील, अजित हलकर्णी, विलास ताशिलदार, पवन देसाई, गुरुराज हलगत्ती, यतेश हेब्बाळकर, लक्ष्मी परमेकर, उमा सोनवडेकर सुमन राजगोळकर, गणपतराव देसाई आदींसह भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.