बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरात अलीकडे घडलेल्या दुचाकींच्या चोरी प्रकरणी माळमारुती पोलिसांनी एका अट्टल दुचाकी चोरट्याला गजाआड केले असून त्याच्याकडून सुमारे 6 लाख रुपये किमतीच्या चोरीच्या 7 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव विठ्ठल सदेप्पा अरेर (वय 35, रा. शिगीहळळी, ता. बैलहोंगल) असे आहे. बेळगाव शहरात अलीकडे घडलेल्या विविध दुचाकी चोरी प्रकरणांची गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक यांना दुचाकी चोरट्यांचा छडा लावण्याचा आदेश दिला होता.
त्यानुसार तपास सुरू असताना माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दुचाकी चोरीचा तपास करताना पोलिसांनी संशयावरून विठ्ठल अरेर याला ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत विठ्ठल याने दुचाकी चोरींची कबुली दिली.
त्यानुसार चोरीला गेलेल्या सुमारे 6,00,000 रुपये किमतीच्या 7 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. सदर दुचाकींमध्ये 1 यामाहा, 2 स्प्लेंडर, 2 स्प्लेंडर प्रो, 1 एच एफ डिलक्स आणि 1 जुपिटर यांचा समावेश आहे.
याप्रकरणी गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई केली जात आहे. मार्केट विभागाचे एसीपी सोमेगौडा जी. एम. आणि माळ मारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक होन्नप्पा तळवार, पोलीस उपनिरीक्षक श्रीशैल हुळगेरी आणि त्यांच्या सहकार्याने उपरोक्त कारवाई केली.
या सर्वांचे पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग आणि पोलीस उपायुक्तांनी अभिनंदन करून शाबासकी दिली आहे.