बेळगाव लाईव्ह : लोकसभा निवडणुकीच्या निकालाची अंतिम आकडेवारी जाहीर झाली असून बेळगाव लोकसभा मतदार संघावर पुन्हा भाजपनेच आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तब्बल १ लाख ७७ हजार मताधिक्क्याने भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी विजय साधला असून काँग्रेसचे मृणाल हेब्बाळकर हे पराभूत झाले आहेत.
बेळगाव लोकसभा मतदार संघावर भाजपचेच वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. २००४ पासून आजवर भाजपनेच हा मतदार संघ आपल्या कब्जात ठेवला आहे. निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून शेट्टर यांच्यावर बाहेरचा उमेदवार असा शिक्का असल्यामुळे त्यांना या मतदार संघातून कडवी लढत लढावी लागेल असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत होता. मात्र भाजपने एकहाती सत्ता स्थापन करत बेळगावमध्ये विजयाचा षटकार मारला आहे.
२००४, २००९, २०१४, २०१९ या चारही निवडणुकीत भाजपचे सुरेश अंगडी हे विजयी ठरले होते. त्यानंतर सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर २०२१ साली झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांची पत्नी मंगला अंगडी यांना उमेदवारी देण्यात आली आणि पुन्हा या निवडणुकीत भाजपनेच आघाडी राखली. २०२१ साली झालेल्या निवडणुकीनंतर देशभरात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बाहेरचे उमेदवार असूनही जगदीश शेट्टर यांनी बाजी मारली स्थानिक भाजप नेत्यांचे नाराजीनाट्य सुरु असूनही मोठ्या फरकाने जगदीश शेट्टर यांनी मिळविलेल्या विजयाची चर्चा रंगू लागली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बेळगाव दौरा, स्थानिक नेत्यांना वरिष्ठांकडून मिळालेली समज आणि अखेर देशभरातील मोदी लाट याचा फायदा जगदीश शेट्टर यांना झाला असून उमेदवारी जाहीर झाल्यापासून जगदीश शेट्टर यांच्यावर होणाऱ्या आरोपांना मतांच्या माध्यमातून विरोधकांना प्रत्त्युत्तर मिळाले आहे. जगदीश शेट्टर यांनी ७५०९४९ मते मिळवून विजय साधला आहे. काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी ५७७२१९ मते मिळविली आहेत.