बेळगाव लाईव्ह :कर्नाटक राज्य सरकारच्या वाल्मिकी (एस.टी.) महामंडळामध्ये झालेल्या 187 कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या निषेधार्थ, तसेच घोटाळ्याशी संबंधित आरोपी माजी मंत्री नागेंद्र यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या बेळगाव शहर व जिल्हा शाखेतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडून निदर्शने करण्यात आली.
राज्य सरकारच्या वाल्मिकी (एस.टी.) महामंडळामध्ये झालेल्या 187 कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या निषेधार्थ भाजप राज्य उपाध्यक्ष माजी आमदार ॲड. अनिल बेनके, खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर आदी नेत्यांच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडून निदर्शने करण्यात आली.
यावेळी राज्य सरकार आणि माजी मंत्री नागेंद्र यांच्या धिक्काराच्या घोषणा देण्यात येत होत्या. यावेळी कार्यकर्त्यांनी हातात धरलेले निषेध असे फलक साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी माजी आमदार ॲड. बेनके, आमदार हलगेकर आदींच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून पुढील कार्यवाही त्वरेने करण्याचे आश्वासन दिले. मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्त्यांचा सहभाग असणाऱ्या या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले की, कर्नाटक सरकारच्या वाल्मीकी निगममध्ये मागील वर्षी 187 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्टाचारामुळे लाभार्थींपर्यंत त्यांचे पैसे न पोहोचता मध्येच हडप झाले आहेत. परिणामी अनुसूचित जातीच्या गरीब जनतेवर अन्याय झाला आहे. सदर भ्रष्टाचारात कर्नाटक सरकार सामील असल्यामुळे आरोपी असलेल्या माजी मंत्री नागेंद्र यांच्यावर अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही.
यासाठी आम्ही हे आंदोलन छेडले असून आमच्या मागणीची गांभीर्याने दखल घेत सरकारने तात्काळ माजी मंत्री नागेंद्र यांच्यावर ठोस कारवाई करावी. तसेच जे जे लाभार्थी आहे त्यांना ताबडतोब त्यांची रक्कम देण्यात यावी, अशी आमची मागणी आहे, असे आमदार हलगेकर यांनी सांगितले.