‘बेळगाव लाईव्ह : सरकार आणि विमानतळ प्राधिकरणाच्या झालेल्या करारानुसार 2017 ते 2022 पर्यंत विमानतळाला करामध्ये सूट देण्यात आली होती. परंतु त्यानंतरही विमानतळ प्राधिकरणाने ग्राम पंचायतीकडे कर जमा केला नसून तब्बल 1 कोटी 50 लाख रुपयांचा कर बेळगाव विमानतळ प्राधिकरणाने थकविला आहे.
विमानतळ प्राधिकरणाच्या बैठकीत सांबरा विमानतळाकडून ग्रा. पं. ला थकीत कराचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. ग्रा. पं. कडून वेळच्या वेळी सूचना करून देखील विमानतळ प्राधिकरणाने कर भरण्याकडे कानाडोळा केला.
त्यामुळे जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी सांबरा ग्रा. पं. ची भेट घेऊन थकीत कराविषयीची माहिती घेतली होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कर भरण्याच्या सूचना विमानतळ प्राधिकरणाला केल्या आहेत.
करारानुसार दरवर्षी सांबरा ग्रामपंचायतीला द्यावा लागणारा 50 लाख रुपये कर 2022 पासून थकविण्यात आला असून थकीत कराची रक्कम 1 कोटी 50 लाख रुपये इतकी झाली आहे.
यामुळे थकीत कराची ही रक्कम येत्या दोन दिवसांत ग्राम पंचायतीकडे भरण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बेळगाव विमानतळाला केल्या आहेत. त्यामुळे लवकरच हा थकीत कर सांबरा ग्राम पंचायतीला मिळणार आहे.