बेळगाव लाईव्ह: मागील वर्षी प्रमाणे पावसाळ्यात यंदाही महत्त्वाच्या धबधब्यांवर पर्यटन बंदी केली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर करायच्या आताच खानापूर तालुक्यातील वन खात्याने धबधब्यावर वर्षा पर्यटनासाठी बंदी घातली आहे.
वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध पश्चिम भागातील सर्वच धबधब्यांच्या ठिकाणी यंदाही पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव वनविभागाने हे पाऊल उचलले आहे. सर्व मार्गांवर तपासणी नाके सुरू करण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा खानापूरच्या एसीएफ सुनीता निंबरगी यांनी दिला आहे.
कणकुंबी, पारवाड, चिखले, चिगुळे, चापोली, माण येथील धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटन सुविधांचा व सुरक्षा यंत्रणांचा अभाव आहे. धबधब्या खाली भिजण्याच्या आणि सेल्फी घेण्याच्या नादात अनेक दुर्घटना घडल्या आहेत. अनेक तरुण नशेत नको ते धाडस करतात. परिणामी जीव धोक्यात घालण्याचे धाडस अनेकांच्या अंगलट आले आहे त्यामुळे यंदाही बंदी घालण्यात आली आहे.बऱ्याचदा जंगलात गेलेले पर्यटक परत येताना दाट धुक्यामुळे वाट चुकून हरवण्याचे प्रमाणही वाढले आहे. अशाप्रसंगी वनविभागाला धो धो पावसात मदत कार्य राबविताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
आवश्यक सुरक्षा यंत्रणा उपलब्ध होईपर्यंत या पर्यटन स्थळांवर प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे. धबधब्यांच्या सर्व मार्गांवर कणकुंबी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
चापोली येथील कोटनी डॅम आणि वज्रपोहा धबधब्याकडे जाणाऱ्यांची संख्या वाढली होती. या मार्गावर असलेल्या शिकार विरोधी केंद्रामध्ये २४ तास कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत. यामुळे मद्यपी तरुणांच्या हुल्लडबाजीला आळा बसणार असल्याने स्थानिकांनी बंदीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.