बेळगाव लाईव्ह :झाकीर उर्फ जयेश पुजारी याने 2018 मध्ये एडीजीपी आलोक कुमार यांना त्रास दिला होता. त्यासंदर्भात आज जेंव्हा त्याला चौकशीसाठी न्यायालयात बोलावले असता त्याने पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा देण्याचा जो प्रकार केला त्याची सखोल चौकशी केली जाईल, असे कायदा व सुव्यवस्था पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी स्पष्ट केले.
बेळगाव शहरातील एपीएमसी पोलीस ठाण्यात आज बुधवारी पत्रकारांशी बोलताना पोलीस उपायुक्त (डीसीपी) जगदीश यांनी उपरोक्त स्पष्टीकरण दिले.
झाकीर उर्फ जयेश पुजारी हा मूळ मंगळुरू येथील आरोपी आहे. आरोपीचे नांव बदलण्याबाबतही तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. हत्येच्या दोन गुन्ह्यांमध्ये जयेश पुजारी हा जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.
हिंडलगा तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या जयेश याला आज चौकशीसाठी न्यायालयात बोलावले होते. त्यावेळी त्याने पाकिस्तान समर्थनार्थ दिलेल्या घोषणांची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
जयेशने केरळमध्ये जाऊन इस्लाम धर्म स्वीकारल्याची माहिती उपलब्ध झाली असून त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी सांगितले.