बेळगाव लाईव्ह : बेळगाव विमानतळाचा दर्जा दिवसेंदिवस घसरत चालला असून एकापाठोपाठ एक अशा सेवा विमानतळावरून बंद करण्यात येत आहेत. गेल्या वर्षभरात स्टार एअरने विविध ठिकाणच्या सेवा बंद केल्या असून आता बेळगाव-सुरत आणि बेळगाव-किशनगड येथील उड्डाणे अचानक रद्द केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. एअरलाइनने 19 जुलैपासून बेळगाव-जोधपूर मार्गाचे बुकिंग बंद केले आहे.
केंद्राच्या महत्त्वाकांक्षी उडान योजनेंतर्गत 2021 मध्ये सुरू करण्यात आलेल्या बेळगाव-जोधपूर थेट उड्डाणाचा विचार करता स्टार एअरने घेतलेला हा निर्णय मोठा धक्का आहे. तीन वर्षे UDAN लाभ घेतलेल्या या मार्गाची सबसिडी मार्च 2024 मध्ये संपुष्टात आली नफ्याविना सुविधा पुरवणाऱ्या आणि 100 टक्के प्रवासी क्षमता राखूनही, स्टार एअरने या महत्त्वाच्या ठिकाणाचे बुकिंग बंद केले आहे.
सध्या, बेळगाव विमानतळाच्या थेट उड्डाणांमध्ये अहमदाबाद (स्टार एअर), जोधपूर (स्टार एअर, जुलै १९ पर्यंत), मुंबई (स्टार एअर), तिरुपती (स्टार एअर), नागपूर (स्टार एअर), जयपूर (स्टार एअर), बेंगळुरू (इंडिगो), हैदराबाद (इंडिगो), नवी दिल्ली (इंडिगो), भुज (अहमदाबाद मार्गे, स्टार एअर) या ठिकाणांचा समावेश आहे.
अलीकडेच बेळगाव – जोधपूर सेवा बंद करण्यात आली होती. आता या पाठोपाठ बेळगाव – सुरत आणि बेळगाव – किशनगड देखील बंद झाल्याने या ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. सुमारे १४५० किलोमीटर कापण्यासाठी २५ तास हा प्रवास इतर वाहतुकीच्या माध्यमातून सहन करण्याशिवाय प्रवाशांकडे कोणताही पर्याय उरला नाही.
नॉन-स्टॉप फ्लाइट्सने असंख्य लोकांसाठी प्रवास लक्षणीयरीत्या सुलभ केला होता. मात्र अचानक बंद झालेल्या या सुविधेमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे.