Monday, December 23, 2024

/

बेळगावमध्ये सोशल मीडिया हॅकिंग प्रकार वाढले!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : सोशल मीडिया हा आजकाल प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकालाच सोशल मीडियाची भुरळ पडली आहे.

सोशल मीडियाच्या आभासी जगात वावरताना जितके फायदे होत आहेत त्यापेक्षा कैकपटीने त्याचे नुकसान अधिक होत आहे. कुणासाठी मनोरंजन तर कुणासाठी माहिती मिळविण्याचे साधन तर कुणासाठी फसवणुकीचे जाळे! विविध गोष्टींसाठी वापरकर्त्यांना भुरळ घालणाऱ्या सोशल मीडियाबाबत सर्वसामान्य नागरिकांनी मात्र जागरूक राहणे गरजेचे आहे.

बेळगावमध्ये आजवर अनेक सोशल मीडिया अकाउंट्स हॅक झाले आहेत. कित्येक वापरकर्ते फसवणुकीच्या जाळ्यात अडकले आहेत. कुणाचे आर्थिक नुकसान तर कुणाचे मानसिक!

आज बेळगावमध्ये माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांच्यासोबतही असाच प्रकार घडला आहे. त्यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाले असून त्यांच्या नावे इतर कुणीतरी पोस्ट टाकत आहे. सदर अकाउंट फेक असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. मात्र या प्रकारानंतर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

सोशल मीडियावर हल्ली प्रत्येकजण आपली वैयक्तिक माहिती टाकत असतो. परंतु केवळ मनोरंजन वगळता ही बाब समोरचा व्यक्ती कशापद्धतीने घेतो याचे विचारमंथन होणे गरजेचे आहे. याबाबत सोशल मीडियावरील अकाउंट्स वापरण्याबाबत जनजागृतीची गरज असून सोशल मीडिया हाताळताना आपण कोणत्या खबरदारी घेतल्या पाहिजे यावर देखील प्रत्येकाने विचार करणे गरजेचे आहे.

अनेक सोशल मीडियाचे अकाउंट्स हॅक करून त्यामाध्यमातून अश्लील पोस्ट टाकल्या जातात. कित्येकांची आर्थिक फसवणूक झाली आहे. तर कित्येकांना याचा मानसिक फटका देखील बसला आहे.

सायबर पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीसाठी विशेष मोहीम आखली आहे. परंतु सायबर पोलिसांच्या माध्यमातून असे प्रकार रोखण्यासाठी व्यापक जनजागृती करणे देखील आवश्यक आहे. पण तोवर प्रत्येकाने आपले सोशल मीडिया अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी सजग राहणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.