बेळगाव लाईव्ह:बाधकाम क्षेत्रातील दिग्गज लार्सन अँड टुब्रो लिमिटेडद्वारे (एल अँड टी) बेळगाव, कलबुर्गी आणि हुबळी येथे 24/7 पिण्याच्या पाणी पुरवठा प्रकल्प व्यवस्थित राबविण्यात होणारा अवास्तव विलंब आणि अयोग्य अंमलबजावणीची गंभीर दखल घेत सरकार सदर कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत असल्याची माहिती ग्रामविकास व पंचायत राज मंत्री आणि कलबुर्गीचे प्रभारी प्रियांक खर्गे यांनी दिली.
कलबुर्गी येथे बोलताना मंत्री खर्गे यांनी सांगितले की, पुढील मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा करून एल अँड टी विरुद्ध कारवाई करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. हुबळी, बेळगाव आणि कलबुर्गी येथील 24/7 पिण्याच्या पाणी पुरवठा प्रकल्पांवर एल अँड टी चे काम असमाधानकारक आहे.
कंपनीने बेपर्वाईने शहरातील रस्ते खोदले आहेत आणि पाण्याचे पाईप टाकल्यानंतर खड्डे योग्यरित्या बजवलेले नाहीत. मी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाईचा विचार करण्याची विनंती केली आहे. संबंधित तीन महापालिकांसाठी पाणीपुरवठा प्रकल्प महत्त्वाचे असल्याने मुख्यमंत्र्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून या विषयावर पुन्हा एकदा चर्चा करणे पसंत केले आहे, अशी माहिती त्यांनी पुढे दिली.
पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था न करता अचानक कायदेशीर कारवाई केल्याने होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार करण्याची गरजही त्यांनी प्रतिपादित केली. या लोकांसाठी (एल अँड टी अधिकारी) शब्द पुरेसे नसून ते कठोर कायदेशीर कारवाईसच पात्र आहेत. कंपनीतील कनिष्ठ दर्जाच्या अभियंत्यांना जबाबदार धरून त्यांना फटकारणे परिणामकारक होणार नाही.
कंपनीकडून चालू असलेले सर्व प्रकल्प काढून घेणे आणि भविष्यातील निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यापासून रोखणे, असाच धडा त्यांना शिकवला पाहिजे.
त्याचप्रमाणे असे कांही सरकारी अधिकारी आहेत जे करदात्यांच्या पैशातून आपला पगार काढतात आणि काम मात्र कंपनीसाठी करतात. आता अशा अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल, असे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्पष्ट केले.