Thursday, December 19, 2024

/

तो अपघात नव्हता तर.. खून पाच जण अटकेत

 belgaum

बेळगाव लाईव्ह:बेळगाव सिव्हिल हॉस्पिटल मधील चीफ डेप्युटी फार्मासिस्ट वीरुपाक्षप्पा हर्लापूर यांचा मृत्यू हा अपघाती नसून त्यांचा खून झाल्याची धक्कादायक माहिती घडकीस येताच सदर खून प्रकरणी बेळगाव शहर रहदारी आणि एपीएमसी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी 5 संशयितांना अटक केली आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे बसवराज यल्लाप्पा भगवती (वय 50, मूळचा रा. धारवाड, सध्या रा. भारत कॉलनी माळमारुती एक्सटेन्शन), प्रकाश राठोड (वय 41, रा. रामदेव गल्ली कंग्राळी खुर्द), रवी बसू कुंबरगी (वय 28, रा. शास्त्रीनगर कंग्राळी बी.के.), सचिन पाटील (वय 24, कंग्राळी बी.के.) आणि रामू लगमा वंटमुरी (वय 28, रा. कंग्राळी बी.के.) अशी आहेत.

बसवराज हा खून झालेल्या वीरुपक्षप्पा यांचा नातेवाईक असल्याचे कळते. या प्रकरणाची माहिती अशी की, बेळगाव सिव्हिल हॉस्पिटल (बीम्स) मधील चीफ डेप्युटी फार्मासिस्ट वीरुपाक्षप्पा हर्लापूर (वय 60, रा. सत्तूर, जि. धारवाड) यांचा गेल्या 30 मे रोजी बीम्स जवळ अपघात झाला होता. चन्नम्मा सर्कल येथून येणाऱ्या कारने धडक दिल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते.

अपघात घडताच कार चालकाने घटनास्थळावरून पलायन केले होते. त्यानंतर हर्लापूर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी रहदारी उत्तर पोलीस ठाण्यात ‘हीट अँड रन’ म्हणून गुन्हा नोंदविण्यात आला होता. तथापि पोलीस चौकशीत आणि मोटारीचा तपास घेतल्यानंतर हर्लापूर यांचा मृत्यू अपघाती नसून खुनाचा प्रकार असल्याचे उघडकीस आले.Murder

रहदारी उत्तर विभाग पोलीस आणि एपीएमसी पोलिसांच्या पथकाने हे खळबळजनक प्रकरण उघडकीस आणले. खुनाचा पूर्वनियोजित कट 10 लाखाची सुपारी देऊन तडीस नेण्यात आल्याचे समजते. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी बसवराज भगवंत याच्यासह उपरोक्त चौघा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

अत्यंत नियोजन पद्धतीने शोध घेऊन खून प्रकारणाचा छडा लावल्याबद्दल शहर पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बनिंग आणि पोलीस उपायुक्तांनी रहदारी उत्तर विभागाचे एसीपी पवन एन., पोलीस निरीक्षक पी. आर. चन्नगिरी, एपीएमसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खाजा हुसेन आणि त्यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकांचे अभिनंदन करून शाबासकी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.