बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्यातील १४ मतदारसंघातील २२७ जागांसाठी आज दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडले आहे. मतदान प्रक्रिया सुरु झाल्यानंतर सुरु झालेल्या निवडणूक रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. प्रत्येक जागेवर सर्वच उमेदवारांनी विजयाचा दावा केला.
जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावल्या आणि आजअखेर राज्यात मतदानाचा दुसरा टप्पा पार पडला. काही अपवाद वगळता सर्वत्र निवडणूक शांततेत पार पडली. राज्यातील जनतेने आपला कौल आज दिला असून आता उमेदवारांसह नागरिकांचे लक्ष निकालाकडे वेधले आहे.
येत्या ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. बेळगाव जिल्ह्यात सरासरी मागील निवडणुकीपेक्षा अधिक मतदान झाले असून ७१.३८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष वेढलेल्या बेळगाव जिल्ह्यात उत्स्फूर्तपणे मतप्रक्रिया पार पडली असून भाजपचे जगदीश शेट्टर, काँग्रेसचे मृणाल हेब्बाळकर आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे महादेव पाटील यांच्यात चुरशीची लढत झाली आहे.
हिंदुत्व आणि मोदी लाटेच्या मुद्द्यावर बाहेरचा उमेदवार असा शिक्का असलेले जगदीश शेट्टर, कौटुंबिक पार्श्वभूमी राजकारणाची असलेले आणि आईच्या राजकीय अनुभवातून राजकारणात उतरलेले, काँग्रेसचे युवा नेतृत्व मृणाल हेब्बाळकर आणि सीमाप्रश्न तसेच मराठीच्या मुद्द्यावरून मराठी भाषिकांचा कौल केंद्रीय नेतृत्वावर बिंबविण्यासाठी निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील यांच्यात चुरशीची निवडणूक झाली आहे.
राज्य पातळीवर हुबळी हत्याकांड, सत्ताधारी सरकारने दिलेल्या हमी योजना, हिंदुत्व आणि राममंदिराचा मुद्दा यासह देशभरातील मोदी लाट, निवडणुकीच्या तोंडावर उजेडात आलेले खासदार प्रज्वल रेवण्णा यांचे सीडी प्रकरण यासह महागाई, दरवाढ, सोन्याचे वाढलेले दर या ऐरणीच्या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचारादरम्यान जुंपल्याचे चित्र पाहायला मिळाले.
जिल्हा प्रशासनाने केलेल्या निवडणुकीच्या चोख तयारी आणि बंदोबस्तात निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडली असून लक्षवेधी ठरलेल्या या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.