बेळगाव लाईव्ह : श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिर, सव्यासाची गुरुकुलम व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान यांच्या वतीने आयोजिण्यात आलेल्या बालसंस्कार शिबिराची सांगता झाली.
१७ मेपासून भारतीय युद्ध कला लाठीकाठी व शस्त्र आणि शास्त्र यावर आधारित बालसंस्कार शिबिर आयोजित केले होते. या शिबिराचा सांगता समारोह आज कपिलेश्वर मंदिर तलाव परिसरात पार पडला.
कपिलेश्वर देवस्थान ट्रस्टी आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे इचलकरंजीचे महाजन गुरुजी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजपूजन, शस्त्र पूजन आणि शिवमूर्ती पूजन पार पडले. यावेळी गेल्या दहा दिवसात बालसंस्कार शिबिरात शिकविण्यात आलेल्या लाठी-काठी-युद्धकला प्रात्यक्षिकांचे प्रशिक्षणार्थींनी सादरीकरण केले.
यावेळी बेळगावमधील बसवण कुडची येथील श्री बालशिवाजी लाठीमेळ्याच्या प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित बालसंस्कार शिबिरातील प्रशिक्षणार्थींच्या हस्ते मातृपितृ पूजन करण्यात आले.
श्री कपिलेश्वर देवस्थानाच्यावतीने विशेष प्रशस्तीपत्रक देऊन शिबिरार्थींना गौरविण्यात आले. या शिबिरासाठी दौलत जाधव, राहुल कुरणे, अजित जाधव, जयंत गुरव, विनायक किनेकर, अभी पवार, प्रथमेश कावळे, सचिन चोपडे व मच्छे येथील श्री चक्रपाणी बालसंस्कार शिबिरातील युवक व युवतींचे विशेष परिश्रम लाभले. सुत्रसंचलन आणि आभार अभिजीत चव्हाण यांनी मानले.