बेळगाव लाईव्ह :दुष्काळी परिस्थितीमुळे बेळगाव जिल्हासह उत्तर कर्नाटकातील अनेक गावातील कुटुंब पोटापाण्यासाठी महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यात गेली आहेत.
हे राज्याबाहेर गेलेले मतदार येत्या मंगळवारी 7 मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नयेत यासाठी त्यांना मतदानादिवशी जिल्ह्यात आणण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगातर्फे सुरू आहे.
गेल्या दोन महिन्यांपूर्वी उत्तर कर्नाटकातून 2 लाखाहून अधिक जण कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात कामासाठी गेल्याचा अंदाज आहे. त्यांना मतदाना दिवशी संबंधित जिल्ह्यात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे या मतदारांना विशेष सवलत देण्याबाबत विचारविनिमय सुरू आहे.
निवडणुकीच्या दिवशी परराज्यात गेलेला कामगार कुटुंबीयांना मतदानादिवशी वेतनसहित रजा जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या प्रवासाचा (येण्याजाण्याचा) व जेवणा खाण्याचा खर्च करण्यासाठी राजकीय पक्षांच्या उमेदवाराकडून तयारी सुरू आहे. प्रत्येक मत महत्त्वाचे असल्याने या निवडणुकीत अधिकाधिक मतदान व्हावे यासाठी अन्य राज्यात कामासाठी गेलेल्या मतदारांना मंगळवारी मतदानादिवशी त्यांच्या -त्यांच्या गावात आणून त्यांचे मतदान करून घेण्याची जबाबदारी राजकीय पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांवर सोपवली आहे.
दुसरीकडे, केवळ मतांसाठी आमचा विचार केला जातो, दुष्काळी परिस्थितीत त्यांना आमची आठवण आली नाही का? असा प्रश्न संबंधित कामगार कुटुंबीयांकडून केला जात आहे. सध्या उष्म्याची लाट असल्याने अन्य राज्यातून केवळ मतदानासाठी मूळगावी कुटुंबासमवेत ये -जा करणे कष्टाचे आहे. यासाठी विविध विभागातील कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सवलतींप्रमाणे आम्हालाही टपाल मतदानाची व्यवस्था करावी, अशी मागणी परराज्यात गेलेल्या कामगारांकडून होत आहे.
दरम्यान, दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील असंख्य कुटुंब रोजगारासाठी अन्य राज्यात गेली आहेत. मात्र मतदानाचा हक्क बजावणे सर्वांचे कर्तव्य आहे. त्यामुळे येत्या 7 मे रोजी होणाऱ्या मतदानादिवशी परगावी गेलेल्या मतदारांनी आपल्या गावी येऊन मतदान प्रक्रियेत भाग घ्यावा, असे आवाहन बेळगाव जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी केले आहे.