बेळगाव लाईव्ह :भारतीय विमानतळ प्राधिकरणाने सर्वाधिक प्रवासी संख्या असणाऱ्या विमानतळांची यादी नुकतीच जाहीर केली असून त्यामध्ये बेळगाव विमानतळाने पुन्हा बाजी मारत राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे.
हुबळी विमानतळालाही मागे टाकणाऱ्या बेळगाव विमानतळावरून गेल्या फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्याच्या कालावधीत सुमारे 90,000 प्रवाशांनी विमान प्रवासाचा लाभ घेतला आहे.
यापैकी मार्च महिन्यात बेळगाव येथून 30,290 जणांनी विमान प्रवास केला आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जाहीर केलेल्या आकडेवारी पहिल्या क्रमांकावर नेहमीप्रमाणे बेंगलोर येथील केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, तर दुसऱ्या क्रमांकावर मंगळूर विमानतळ आहे.
हुबळी विमानतळ चौथ्या आणि म्हैसूर विमानतळ पाचव्या क्रमांकावर आहे. गेल्या कांही महिन्यांपासून बेळगाव विमानतळाने प्रवासी संख्येच्या बाबतीत हुबळी विमानतळाला सातत्याने मागे टाकले आहे.
गेल्या मार्च महिन्यात बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 28,30,919 प्रवाशांनी देशांतर्गत प्रवास तर 3,97,150 प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला आहे. मंगळूर विमानतळावरून देशांतर्गत प्रवास केलेल्यांची संख्या 1,32,124 इतकी तर आंतरराष्ट्रीय प्रवास केलेल्यांची संख्या 47,957 इतकी आहे.
बेळगाव विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमान सेवा नाही. तथापि मार्चमध्ये येथून 30,290 जणांनी देशांतर्गत प्रवास केला आहे. हुबळी विमानतळावरून 22,817 जणांनी तर मैसूर विमानतळावरून 8,199 जणांनी प्रवास केला आहे.
बेळगाव विमानतळावरून पुणे व देशाच्या अन्य कांही शहरांना थेट विमान सुरू करण्याची मागणी सुरू असून ही मागणी मान्य झाल्यास भविष्यात बेळगाव विमानतळाची प्रवासी संख्या आणखी वाढणार हे निश्चित आहे.