बेळगाव लाईव्ह:प्रेमाला नकार देणाऱ्या युवतीच्या घरावर दगडफेक करून तिला धमकावल्याच्या आरोपावरून बेळगाव ग्रामीण पोलीसांनी किणये (ता. बेळगाव) येथील एका युवकाला अटक केली आहे. चार दिवसांपूर्वी घडलेल्या या घटने प्रकरणी एफआयआर दाखल करून घेण्यास पोलिसांनी प्रारंभी टाळाटाळ केली होती.
अटक केलेल्या पागल प्रेमी युवकाचे नांव तिप्पाण्णा सुभाष डुकरे (वय 25, रा. किणये) असे आहे. तिप्पाण्णा याने एकटीच असल्याचे पाहून गावातील एका युवतीच्या घरावर दगडफेक करून शिवीगाळ केली होती. गेल्या 21 मे रोजी सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल झाला होता.
या घटनेनंतर तिप्पाण्णाने गावातून पलायन केले होते. तथापि बेळगाव ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक करून काल शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले. दरम्यान जिच्या घरावर दगडफेक झाली ती युवती सुरुवातीला फिर्याद नोंदवण्यास केली असता पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा आरोप आहे. मात्र पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बनिंग यांनी कानउघडणी करताच एफआयआर दाखल करून घेतला गेला होता.
बेळगावमध्ये शिक्षण घेणाऱ्या किणये येथील संबंधित 21 वर्षीय युवतीचा पाठलाग करत तिप्पाण्णाने तिच्याकडे प्रेमासाठी तगादा लावला होता. तिने नकार देताच गेल्या वर्षापासून त्याने तिला त्रास देण्यास सुरुवात केली होती त्याच्या त्रासाला कंटाळून तब्बल आठ महिने संबंधित युती आपल्या आईसह गाव सोडून नातेवाईकांच्या घरी राहायला गेली होती.
मात्र तरीही बेळगाव ग्रामीण पोलिसांना याचे गांभीर्य वाटले नाही अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कान उघडणे केल्यानंतर त्यांनी दगडफेक प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे.