बेळगाव लाईव्ह :शिवसेना चौक, येळ्ळूर येथील कोसळलेल्या गटारीकडे ग्रामपंचायतीचे साफ दुर्लक्ष होत असल्यामुळे परिसरातील नागरिकात तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी सदर गटारीचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे.
येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथील शिवसेना चौकाजवळील मुख्य रस्त्या शेजारील जुनी गटार गेल्या कांही वर्षापासून कोसळलेल्या अवस्थेत आहे. परिणामी बांधकामाचे दगड -माती कोसळल्यामुळे था गटारीमध्ये मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढली असून प्रचंड गाळ साचला आहे.
परिणामी सांडपाण्याचा निचरा न होता ते तुंबून सर्वत्र अस्वच्छतेसह दुर्गंधीचे वातावरण पसरलेले असते. या गटारीच्या बांधकामासंदर्भात गेल्या 5 महिन्यात 3 वेळा निवेदन देऊनही फक्त आश्वासनं ऐकायला मिळतं असल्यामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शिवसेना चौक मेन रोडची गटार फार जुनी असून ती कोसळलेली आहे. ग्राम पंचायतीकडे ही गटार स्वच्छ करून नव्याने बांधून द्यावी अशी तीन वेळा निवेदनाद्वारे मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आम्ही जायच कुणाकडे? असा प्रश्न जनतेला पडला आहे. सदर गटारीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात घाण साचून दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.
तेथील आजूबाजूचे लोक घरातील घाण -केरकचरा टाकण्याबरोबरच सांडपाणी या गटारीत सोडत असल्यामुळे तेथे वावरणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही आश्वासनापलीकडे कोणतीही कार्यवाही केली जात नाही. सदर गटारीची वेळीच साफसफाई करून बांधकाम न केल्यास ऐन पावसळ्यामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे.
मतदान आले की हात जोडून यायचं आणि नंतर 5 वर्षे जनतेला हात जोडायला लावायच अशी परिस्थिती येळ्ळूरमध्ये झाली आहे. तथापि शिवसेना चौकातील कोसळलेल्या गटारीची तात्काळ साफसफाई करून बांधकाम करावे अन्यथा आपल्याला वेगळे पाऊल उचलावे लागेल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.