Wednesday, January 8, 2025

/

अचिन्हांकित स्पीड ब्रेकरमुळे अपघात; नेटकऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील सेंट्रा केअर हॉस्पिटल जवळ काँग्रेस रोडवर घडलेल्या एका गंभीर अपघातात अचानक चिन्हांकित नसलेला गतिरोधक समोर आल्यामुळे एक दुचाकी चालक सुमारे 20 फूट उडून पडल्याची घटना आज शुक्रवारी घडली. त्यामुळे शहरातील न रंगवलेल्या अचिन्हांकित, अवैज्ञानिक गतिरोधकांसंदर्भात सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

टिळकवाडीतील काँग्रेस रोडवरील सेंट्रा केअर हॉस्पिटल जवळ नव्याने गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसविण्यात आला असला तरी तो रंगवून चिन्हांकित केलेला नाही. परिणामी हा गतिरोधक धोकादायक बनला असून या मार्गावरून दुसऱ्या रेल्वे गेट आणि त्यापुढे जाणाऱ्या वाहन चालकांनी विशेष करून दुचाकी वाहन चालकांनी या ठिकाणी कमी वेगाने वाहने हाकून स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी आणि संभाव्य अपघात टाळावा असे आवाहन जागरूक वाहन चालकांनी केले आहे.

दरम्यान, आज सेंट्रा केअर हॉस्पिटल जवळ घडलेल्या अपघाताबद्दल सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. बेळगाव हे अनावश्यक गतिरोधकांनी भरले आहे. रस्ते कमी आणि गतिरोधक जास्त झाले आहेत. सर्व गतिरोधकांची उंची अतार्किक आहे असा आरोप एका नेटकऱ्याने केला आहे.

असे करून हॉस्पिटल मधील रुग्णांची संख्या वाढवण्याचा तर त्यांचा प्रयत्न नाही ना? असा सवाल एकाने केला आहे. दुसऱ्या एकाने पी. बी. रोड वर देखील त्यांनी असेच केल्याची प्रतिक्रिया दिली आहे. चिन्हांकित न केलेले गतिरोधक अतिशय धोकादायक असून कॅम्प येथील सेंटपॉल्स हायस्कूल समोर देखील हीच परिस्थिती आहे. बेळगावमध्ये अनावश्यक गतिरोधक बसवण्यात आले आहेत, जे पायऱ्यांप्रमाणे उंच आहे.Speed breaker

त्या नव्या गतिरोधकाच्या ठिकाणी इशारा देणारा चिन्हांकित फलक बसवायला हवा, शहरात अनेक गतिरोधक आहेत जे रंगवलेले चिन्हांकित नाहीत. संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व गतिरोधक पांढरा पट्ट्याने रंगवले जातील किंवा त्यावर रिफ्लेक्टर बसवले जातील याची खबरदारी घ्यावी आणि हे काम लवकर वेळेत पूर्ण करावे, त्याऐवजी पहिल्या रेल्वे गेट जवळ उजव्या बाजूला रॉंग साईडने होणारी वाहतूक रोखण्यासाठी एक कॅमेरा बसवावा.

कारण अनेक लोक या ठिकाणी रॉंग साईडने जातात. त्यामुळे गंभीर अपघात घडू शकतो. तेंव्हा पोलिसांनी तात्काळ कॅमेरा बसवावा जवळपास वर्षभरापूर्वी एक रहदारी पोलीस त्या ठिकाणी काही दिवसांसाठी होता, मात्र त्यानंतर तो दिसला नाही. गतिरोधक पांढऱ्या रंगाचे पट्टे काढून रंगवले पाहिजेत, जेंव्हा जेंव्हा नवे गतिरोधक बसविले जातात तेंव्हा असेच घडते.

या बेजबाबदारपणामुळे मोटरसायकलींवरील युवकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यांना स्पीड ब्रेकर नाही हेड ब्रेकर म्हणा, यासारख्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर आजच्या अपघातासंदर्भाने व्यक्त केल्या जात आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.