Saturday, November 9, 2024

/

शिवरायांच्या जयजयकारात शिवजयंती उत्साहात साजरी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बोलो शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा जयजयकारात मध्यवर्तीय सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळातर्फे परंपरेनुसार आज गुरुवारी सकाळी अपूर्व उत्साहासह भक्तीभावाने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.

शिवजयंती निमित्त मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळातर्फे आज सकाळी प्रथम विविध गडकिल्ल्यांवरून आणलेल्या शिवज्योतींचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे स्वागत करण्यात आले. त्यानंतर शहरातील नरगुंदकर भावे चौक येथे मंडपात स्थापलेल्या शिवमुर्तीचे पूजन केले गेले.

तसेच शहापूर छ. शिवाजी उद्यानातील शिवरायांच्या सिंहासनारूढ मूर्तीला अभिषेक घालून विधिवत पूजनाद्वारे पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांनी बोलो शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय, जय भवानी जय शिवाजी अशा जय जयकाराने उद्यानाचा परिसर दणाणून सोडला होता.

पूजनानंतर शिवरायांची आरती म्हणण्यात आली याप्रसंगी मध्यवर्तीय सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, शहर समितीचे अध्यक्ष माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील, समिती नेते रमाकांत कोंडुसकर, समितीचे लोकसभेचे उमेदवार महादेव पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, मदन बामणे, विकास कलघटगी, राजू पावले, नगरसेवक रवी साळुंखे, दत्ता जाधव आदींसह बहुसंख्य शिवभक्त व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.Shiv jayanti

याप्रसंगी बेळगाव लाईव्हशी बोलताना रमाकांत कोंडुसकर यांनी सर्वप्रथम शिवभक्तांसह समस्त शहरवासीयांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी आपला आयुष्य खर्ची घातलं. तेंव्हा सर्व शिवभक्तांनी व कार्यकर्त्यांनी जीवनात शिवरायांचा आदर्श घेऊन वागले पाहिजे. आपण शिवरायांची प्रेरणा घेतली पाहिजे असे म्हणतो, परंतु ती प्रेरणा तेंव्हाच घेतल्यासारखे होईल जेंव्हा आपण व्यसनांपासून दूर राहू. ज्यावेळी आपला संपूर्ण समाज व्यसनापासून दूर राहील त्याचवेळी आपण खऱ्या अर्थाने शिवरायांची प्रेरणा घेतल्यासारखे होईल.

त्यामुळे माझी सर्व शिवजयंती उत्सव मंडळांना विनंती आहे की त्यांनी शिवजयंती मिरवणुकीमध्ये समाजाला चांगला संदेश देणारे ऐतिहासिक देखावे सादर करावेत. आपल्या देखाव्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जनतेसमोर मांडावेत.

अत्यंत महत्त्वाचे म्हणजे आपण शिवरायांची विचारधारा मानतो, त्यांना पुजतो. तेंव्हा चित्ररथ मिरवणुकीमध्ये माझ्या शिवभक्तांनी कृपया कोणतेही व्यसन करून सहभागी होऊ नये. आपण आपल्या लढवय्या दैवताची मिरवणूक काढत आहोत हे त्यांनी ध्यानात घ्यावे, असे आवाहन कोंडुसकर यांनी शेवटी केले.

ज्येष्ठ शिवभक्त रमेश पावले यांनी यावेळी बोलताना विविध गडकिल्ल्यांवरून आणण्यात येणाऱ्या शिवज्योतींची माहिती दिली. तसेच शिवरायांचे सर्व किल्ले भले महाराष्ट्रात असले तरी शिवरायांचे खरे मावळे बेळगावसह सीमा भागात आहेत आणि याचा आम्हा मराठी माणसांना अभिमान आहे, असे सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.